' मविआ ' विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल :, माघार घेण्यासाठी विशाल पाटलांवर काँग्रेसचा प्रचंड दबाव
दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल यांची समजून काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिला आहे. विशाल यांच्या माघारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव टाकला जात आहे.
दिल्लीतील काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. विशाल पाटील सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहे. सांगलीत भाजपच्या विरोधात एकास एक लढत झाली पाहिजे, यासाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना आग्रही आहे.
विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीत अद्याप सांगली काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार यांच्यासोबत दिसत असले तरी, ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून चार हात दूर आहेत.मतदारसंघातील बहुतांश काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही विशाल यांच्या प्रचारात उघड किंवा गुप्तपणे उतरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सांगलीत विशाल यांची माघार हा कळीचा मुद्दा बनवला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे त्यासाठी काल रात्री सांगलीत मुक्काम ठोकून होते. विशाल पाटील आमच्या कुटुंबातील घटक आहेत आणि ते माघार घेतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेरविचार करावा, अन्यथा पक्षशिस्त भंग केल्याच्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे.
दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल यांची समजून काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा मूड मात्र यावेळी बंडखोरी करण्याचा आणि जोरदार लढत देण्याचा दिसतो आहे. विशाल पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरपारची लढाई करावी, असे आवाहन आज दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.