Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉटरिचेबल

सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉटरिचेबल 


गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर महाविकास आघाडीने घटक पक्षांमधील जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याची घोषणा केली आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागांवर लढणार आहे.

तसेच जागावाटपात कळीचा मुद्दा ठरलेल्या सांगली आणि भिवंडीच्या जागा काँग्रेसने ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सोडल्या आहेत. मात्र प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेली सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने सांगलीतील काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी पेटली आहे. तसेच जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच काँग्रेसचे सांगलीतील अनेक नेते नॉट रिचेबल झाले आहेत. 

सांगलीतील नॉट रिचेबल झालेल्या नेत्यांमध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील आदींचा समावेश आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक नेते आग्रही होते. येथून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश देत सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. त्यामुळे येथून लढण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि इतर कार्यकर्ते नाराज झाले होते. तसेच विश्वजित कदम यांनीही सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. 

दरम्यान, सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले की, मेरिटप्रमाणे ही जागा काँग्रेसला मिळायला हवी होती. त्यासाठी आम्ही राज्यातील आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी वारंवार बोलत होतो. मात्र आता जो काही निर्णय झाला आहे, तो दुर्दैवी आहे. भाजपाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी हा निर्णय झाला की काय, असं आम्हाला वाटतं, असा आरोपही विक्रम सावंत यांनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.