Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतील विमानतळावर कोट्यावधींची तस्करी, नूडल्सच्या पॅकेटमधून आणले होते हिरे

मुंबईतील विमानतळावर कोट्यावधींची तस्करी, नूडल्सच्या पॅकेटमधून आणले होते हिरे

मुंबईतील कस्टमच्या टीमने विमानतळावर 4.44 कोटी रुपयांचे सोने आणि 2.2 कोटी रुपयांचे हिरे जप्त केले आहेत. कस्टमने एकूण 6.46 कोटी रुपयांच्या तस्करीचा माल 13 वेगवेगळ्या प्रकरणात ताब्यात घेतला आहे. तस्करी करणाऱ्या व्यक्तींनी हिरे नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवून आणले होते. याशिवाय सोन्याची तस्करी पॅसेंजरच्या शरिरातून केली जात होती. आणखी एक प्रकरण असे की, एका व्यक्तीने बॅग आणि अंडरगार्मेंट्सच्या माध्यमातून सोन्याची तस्करी केली होती.

संशय न येण्यासाठी अशी केली तस्करी

रिपोर्ट्सनुसार, तस्करांनी हिरे नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवून आणले. जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. पण मुंबई विमानतळावर कस्टम तपासणीवेळी हिऱ्यांची तस्करी केली जात असल्याचे समोर आले. कस्टमने एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. कस्टमने कोलंबो येथून मुंबईत आलेली एक परदेशी महिलेची अडवणूक केली. तिची तपासणी केली असता अंडरगार्मेंट्समध्ये 24K सोने आणि एक कापलेला तुकडा मिळाला ज्याचे वजन एकूण 321 ग्रॅम आहे.

10 जणांकडून जप्त केले 6 किलोंहून अधिक सोने

प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुबई, अबू धाबी, बहरीन, दोहा, रियाद, मस्कट, बँकॉक आणि सिंगापूर अशा ठिकाणाहून आलेल्या 10 जणांची विमानतळावर अडवणूक करण्यात आली. या सर्वांची तपासणी केली असता लपवण्यात आलेले 6.199 किलोग्रॅमचे सोने जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल 4.04 कोटी रुपये आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवण्यात आले होते हिरे

मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या एका व्यक्तीला विमानतळावर अडवण्यात आले. त्याची तपासणी केली असता हिरे जप्त केले. व्यक्तीने हिरे चालाखीने नूडल्सची पाकीटे आणि ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते. या एकूण हिऱ्यांची किंमत 2.02 कोटी रुपये आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.