भाजप नेत्याची काँग्रेसच्या महिला मंत्र्यावर अश्लाघ्य टीका
लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यात अनेक नेतेमंडळी आपापले प्रचार दौरे सुरु करत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे भाजप नेते संजय पाटील यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अशी टिप्पणी केलीय ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
त्यांना एक जास्तीचा पेग घ्यावा लागत असेल
बेळगावमधील हिंडलगा याठिकाणी भाजपाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. यावेळी बोलतानासंजय पाटील यांनी "बेळगाव मतदारसंघात भाजपाला महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धडकी भरली आहे. त्यांना रात्रीची झोपही लागत नसेल. तसेच माजी मंत्री रमेश जारकीहोळी आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे रात्री झोप लागण्यासाठी हेब्बाळकर यांना एक पेग जास्तीचा घ्यावा लागत असेल."
‘त्या’ प्रकरणानंतर राजकारणाला कलाटणी
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा म्रिनल हा बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांच्यावर टीका केली. रमेश जारकीहोळी आणि हेब्बाळकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मार्च २०२१ मध्ये जारकीहोळी यांची एक अश्लील सीडी स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्यानंतर कर्नाटकमध्ये मोठा वाद उद्भवला होता. या सीडी प्रकरणात हेब्बाळकर यांचा हात असल्याचा जारकीहोळी यांचा आरोप होता. तेव्हापासून रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातून विस्तवही जात नाही.
संजय पाटील यांच्या टीकेनंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, भाजपाच्या माजी आमदाराने फक्त माझाच नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. भाजपाचा महिलांप्रती दृष्टीकोन कसा आहे? हे यातून दिसून येते. भाजपाचे नेते राम नामाचा जप करतात, बेटी बचावो, बेटी पढाओ म्हणतात, पण हे सर्व वरकरणी आहे. भाजपाच्या मनात काय आहे? हे संजय पाटील यांच्या ओठावर आले आहे.
दरम्यान संजय पाटील यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धडक दिली. घोषणाबाजी करत संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांची माफी मागावी, अशी मागणीही या महिलांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.