Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुस्लिमांबाबत मोदी यांच्या वक्तव्याने गदारोळ, वाचा नेमकं काय म्हणाले मोदी

मुस्लिमांबाबत मोदी यांच्या वक्तव्याने गदारोळ, वाचा नेमकं काय म्हणाले मोदी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत मुस्लीम समजाबद्दल केलेल्या विधानानं वादाला सुरुवात झालीय. राजस्थानच्या बांसवाडा येथे झालेल्या प्रचारसभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या सभेत बोलताना मोदी म्हणाले की, "काँग्रेसला माता-भगिनींचं सोनं घेऊन ते 'घुसखोरांमध्ये' वाटायची इच्छा आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात मुस्लिमांबद्दलही भाष्य केलं, त्याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं म्हटलं की, "पंतप्रधान या देशात द्वेषाची बिजं पेरत आहेत." या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी मोदींना आव्हान दिलंय की, "आमच्या जाहीरनाम्यात कुठेही हिंदू-मुस्लिम लिहिलेलं दाखवून द्यावं."

मोदी बांसवाड येथील सभेत असंही म्हणाले की, "पुढच्या पाच वर्षात लोकांना मोफत रेशन मिळत राहील आणि मोफत मिळणाऱ्या या धान्याचा सगळ्यात मोठा फायदा या देशातील आदिवासी, दलित आणि मागासवर्सगीय कुटुंबांना मिळणार आहे."

तसंच, मोदी पुढे म्हणाले की, "देशाला एक मजबूत सरकार हवं आहे. एक असं सरकार जे देशाच्या सीमांचे रक्षण करू शकेल आणि गरज पडली तर पाताळातून शत्रूंचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करू शकेल. "एवढा मोठा देश कसलाही ट्रॅक रेकॉर्ड नसलेल्या व्यक्तीच्या हातात देता येईल का? दुसरीकडे एक मोदी आहे ज्याला तुम्ही मागच्या 23 वर्षांपासून ओळखता, मी 13 वर्षं गुजरातमध्ये काम करत असताना डुंगरपूर-बांसवाडा येथील लोकांनी मला अतिशय जवळून बघितलं आहे."

नरेंद्र मोदी यांचं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीकास्त्र

नरेंद्र मोदींनी त्यांच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस या देशातील महिलांकडे असणाऱ्या सोन्याचा हिशोब करून त्या सोन्याचं वाटप करू पाहते आहे. मोदी म्हणाले की, "आदिवासी कुटुंबांकडे चांदी असते त्याचा हिशोब लावला जाईल, माता-भगिणींकडे असणारं सोनंनाणं, संपत्ती सगळ्यांना समान वाटली जाईल. तुम्हाला जे मंजूर आहे का? तुमची संपत्ती घेण्याचा अधिकार सरकारला आहे का? तुम्ही अत्यंत कष्टाने मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारला आहे का?"


मोदी त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की, "आधी जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, याचा अर्थ सगळी संपत्ती एकत्रित करून ती कुणाला वाटली जाईल तुम्हाला माहितीये? ज्यांना जास्त मुलं असतात, ज्यांनी घुसखोरी केलीय अशांना तुमची संपत्ती वाटली जाईल. तुमच्या कष्टाचे पैसे घुसखोरांना वाटलेले तुम्हाला चालतील का? तुम्हाला हे मान्य आहे का?"

मोदी म्हणाले की, "काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात सांगितलं आहे की देशातील माता भगिनींच्या सोन्याचा आढावा घेतला जाईल, त्याची माहिती एकत्रित करून ते सोनं वाटलं जाईल. हे वाटप अशा लोकांना होईल ज्यांच्याबद्दल बोलताना मनमोहन सिंग सरकारने सांगितलं होतं की संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. बंधू भगिनींनो हे 'अर्बन नक्सल' विचार माझ्या भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचतील, हे लोक तिथपर्यंतही जाऊ शकतात."

काँग्रेसनं दिलं नरेंद्र मोदींना आव्हान

काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर टीका करत, म्हटलं आहे की, स्वतः मोदी या देशात द्वेषाची बिजं पेरू पाहत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेलं मतदान पाहून निराश झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पातळी इतकी खाली गेली आहे की ते आता लोकांना घाबरवून मूळ मुद्द्यांपासून मतदारांना भरकटकवू पाहत आहेत."

"काँग्रेसच्या 'क्रांतिकारी जाहीरनाम्याला' मिळालेलं समर्थन आता दिसू लागलं आहे. देश आता आपल्या प्रश्नांवर मतदान करेल, आपल्या रोजगारासाठी, कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी मतदान करेल. भारत भरकटणार नाही!" काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात ते म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान आज पुन्हा एकदा खोटं बोलले. एक निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही एकापाठोपाठ एक खोटी विधानं करत राहाल. तुम्ही दिलेली वचनं खोटी, तुमची आश्वासनं खोटी, तुमची गॅरंटी खोटी."

खेरा म्हणाले की, "तुम्ही हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून देशाला पुन्हा एकदा खोटं बोलत आहात. मी पंतप्रधान मोदींना आव्हान देतो की आमच्या जाहीरनाम्यात कुठेही मुसलमान किंवा हिंदू हे शब्द असतील तर आम्हाला त्यांनी दाखवून द्यावं. मोदींनी एकतर हे आव्हान स्वीकारावं नाहीतर त्यांचा खोटारडेपणा थांबवावा."

"काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यायाबद्दल लिहिण्यात आलं आहे. या देशातल्या तरुणांना न्याय, महिलांना न्याय, आदिवासींना न्याय, कामगारांना न्याय या मुद्द्यांचा उल्लेख त्यात आहे. पंतप्रधानांना बहुतेक त्यावरच आक्षेप आहे. आणि त्यांना असा आक्षेप असणं हे आम्ही समजू शकतो कारण आमचा जाहीरनामा न्यायाची बात करतो, गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेलं कृत्य दाखवून देतो. हिंदू-मुस्लिम करून करून त्यांनी देशाची दहा वर्षे घालवली आणि आता या निवडणुकीत पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिमाच्या मुद्द्यावर ते बोलत आहेत. पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे."

ते पुढे म्हणाले की, "मोदींना खोटं बोलताना आणि अशापद्धतीने देशाला विभाजित करताना लाज वाटली पाहिजे. मोदीजी तुम्ही खोटं बोलल्यामुळेच लोक आमचा जाहीरनामा वाचत आहेत. या जाहीरमान्यात नेमकं कुठे हिंदू किंवा मुसलमान लिहिलं आहे हे तपासत आहेत. असे शब्द आमच्या जाहीरनाम्यात नाहीत. तुमच्या हा हीन मानसिकतेत विभाजनाबाबत बोललं जातं. तुमच्या मनात विभाजन आहे. हे तुमचे विचार आहेत. "आमच्या जाहीरनाम्यात,आपल्या देशाच्या संविधानात, आमच्या मनात आणि भारतीय समाजात कुठेही अशा पद्धतीच्या विभाजनाबाबत बोललं जात नाही."

पवन खेरा म्हणाले की, "तुमच्या उथळ मानसिकतेतच अशा गोष्टी बोलल्या जातात इतर कुठेही नाही. पंतप्रधानसाहेब तुम्ही खोटं बोलणं बंद केलं पाहिजे. आता फक्त दीड महिना उरलाय, तुम्ही आता निवृत्त व्हायला हवं, सन्मानाने निवृत्त होता येईल. या खुर्चीवर बसून खोटं बोलणं तुम्हाला शोभत नाही. तुमच्या आधी अनेक सुशिक्षित महान व्यक्तिमत्वे या खुर्चीवर बसले आहेत आणि त्यापैकी कुणीही या पद्धतीने खोटं बोलले नाहीत, ज्या पद्धतीने तुम्ही खोटं बोलत आहात."

"तुमच्यानंतरही अनेक चांगले लोक येतील. पंतप्रधान बनतील पण त्यापैकी कुणीही या पद्धतीने खोटं बोलणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने खोटं बोलत आहात, हे जर असंच सुरु राहिलं तर इतिहासात तुमचं नाव कचऱ्याच्या डब्यात जाईल. माफ करा पण आम्ही ही भाषा तुमच्याकडूनच शिकलो आहोत."

दुसरीकडे झारखंडमधील रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "देशातील लोकशाही आणि संविधान नष्ट झाले तर जनतेला काहीही उरणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्यांना मतदानाचा समान अधिकार दिला. ज्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला सन्मान मिळाला. पण नरेंद्र मोदींना गरिबांकडून त्यांचा हक्क हिसकावून घ्यायचा आहे."

पंतप्रधान मोदींबाबत अत्यंत खोचक टीका करत खरगे म्हणाले की, "आजकाल मोदी म्हणतात की मी लोकांसाठी जे काम केलं आहे तो तर फक्त एक 'ट्रेलर' आहे. जर तुमच्या ट्रेलरमध्येच एवढ्या अडचणी असतील तर संपूर्ण चित्रपट कसा असेल?"

युवक काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीव्ही यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करून लिहिलं की, "हा व्यक्ती देशाचा पंतप्रधान आहे हे आपल्या देशाचं मोठं दुर्भाग्य आहे. त्यापेक्षा मोठी समस्या ही आहे भारताचा निवडणूक आयोग आता जिवंत राहिला नाही."

त्यांनी लिहिलं की, "पराभव समोर दिसत असल्यामुळे भारताचे पंतप्रधान आता समाजात द्वेष पसरवू पाहत आहेत. 18 वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांनी केलेलं अपूर्ण विधान चुकीचा संदर्भ देऊन ते वापरत आहेत आणि निवडणूक आयोग (मोदींचा परिवार) त्यांच्यासमोर नतमस्तक झालं आहे." असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "पंतप्रधान मोदींची एकच गॅरंटी आहे, भारतातल्या मुसलमानांना शिव्या देण्याची गॅरंटी."

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसी म्हणाले की, "पंतप्रधान मोदींकडे एकच हमी आहे आणि ती म्हणजे भारतातील मुसलमानांना शिव्या द्या आणि मतं गोळा करा."

ओवैसी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "आज मुस्लिमांना घुसखोर संबोधले म्हटलं गेलं आणि त्यांना जास्त मुलं असतात हे सांगितलं गेलं. 2002 पासून आत्तापर्यंत मोदींनी एकच हमी दिली आहे आणि ती म्हणजे भारतातल्या मुसलमानांना शिव्या द्या आणि लोकांची मतं मिळवा."

ओवैसी म्हणाले की, जर आपण देशाच्या संपत्तीबद्दल बोलत आहोत, तर मोदी सरकारमध्ये त्यांच्या अब्जाधीश मित्रांचा देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क आहे. आज भारतातील 1% लोकांनी देशाची 40% संपत्ती खाल्ली आहे. सामान्य हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवली जात आहे, पण सत्य हे आहे की तुमच्या पैशाने कुणीतरी दुसरंच श्रीमंत होत आहे.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग काय म्हणाले होते?

भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2006 साली राष्ट्रीय विकास परिषदेच्या (NDC) बैठकीत एक भाषण केलं होतं. तिथे भाषण करताना मनमोहन सिंग म्हणाले होते की, "माझा असा विश्वास आहे की आमचे सामूहिक प्राधान्यक्रम अतिशय स्पष्ट आहेत. कृषी, सिंचन-जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय गुंतवणूक आणि सामान्य पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक गुंतवणूकीची गरज या आमच्या प्राथमिकता आहेत. यासोबतच अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गाच्या प्रगतीसाठी विविध कार्यक्रम राबवणे आणि देशातील अल्पसंख्याक समुदाय, महिला आणि लहान मुलांसाठी विकासाचे कार्यक्रम राबवणे यावर आम्ही काम करणार आहोत."
मनमोहन सिंग म्हणाले होते की, "अनुसूचित जाती-जमातींचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. आपण नवीन योजना आणल्या पाहिजेत आणि अल्पसंख्याक आणि विशेषत: मुस्लिमांची प्रगती व्हती आणि त्यांना विकासाचे फायदे मिळावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या सगळ्या वर्गांचा संसाधनांवर पहिला अधिकार असायला हवा. केंद्र सरकारवर अशा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे संसाधनांच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेत असताना प्रत्येक घटकाची गरज समजून घेऊन त्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे."

आणखीन एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे मनमोहन सिंग यांनी हे भाषण इंग्रजीतून केलं होतं. त्या भाषणात त्यांनी 'अधिकार' किंवा 'हक्क' असा शब्द वापरला नव्हता, त्यांनी 'क्लेम' हा शब्द वापरला होता आणि त्याचा मराठीत अर्थ 'दावा' असा होतो. मनमोहन सिंग यांचं हे भाषण पंतप्रधान कार्यालयाच्या अर्काइव्हमध्ये उपलब्ध आहे आणि इथे क्लिक करून तुम्ही ते वाचू शकता.

source: bbc.com/marathi

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.