Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरटीईतील पात्र शाळा चौथी, सातवीपर्यंत

आरटीईतील पात्र शाळा चौथी, सातवीपर्यंत

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी घरांपासून एक किमी अंतरावरील शाळांची यादी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, अपवाद वगळता मुलांना अर्ज भरण्यासाठी इयत्ता चौथी व सातवीपर्यंतच्या शाळा उपलब्ध होत आहेत. परिणामी या शाळांमध्ये आरटीईतून प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांवर पुढे शाळा बदलण्याची वेळ येणार आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवताना काही नियम केले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने आरटीईतून प्रवेश घेतल्यानंतर त्याला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत त्याच शाळेत शिक्षण पूर्ण करावे लागते.

कोणत्याही परिस्थितीत आरटीईच्या विद्यार्थ्याला शाळा बदलून दिली जात नाही, असा शिक्षण विभागाकडे यापूर्वी शाळा बदलांसाठी अर्ज केलेल्या पालकांचा अनुभव आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश देताना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असणारी शाळा असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या अनुदानित, सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या इयत्ता चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे पालक संघटनांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला जात आहे.

दरम्यान, आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत म्हणाले, राज्यभरातून ८ लाख ८६ हजार आरटीई मोफत शाळा प्रवेशासाठी केवळ १२ हजार अर्ज आतापर्यंत भरलेले आहेत. पालकांमध्ये सरकारने आपणास फसवले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. पालक राहतात त्याच्या जवळच्याच भागामध्ये असलेल्या सरकारी शाळा आतापर्यंत त्यांनी नाकारल्या होत्या आणि जिथे थेट प्रवेश उपलब्धच आहे, त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नेट कॅफेमध्ये जाऊन २०० रुपये खर्च करून अर्ज कशाला भरायचा ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच शाळा सिलेक्शनसाठी मोठी यादी येत असून त्यामध्ये बऱ्याचशा सरकारी शाळा चौथीपर्यंतच अथवा सातवीपर्यंतच आहेत.

आरटीईनुसार विद्यार्थ्याला त्यांच्या घराजवळील १ ते ३ किलोमीटर अंतरावरील शाळेत शिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु, सध्या केवळ चौथी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची तजवीज केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत वर्ग असणारी शाळा उपलब्ध होत नाही. जर संबंधित विद्यार्थ्याला घराजवळ आठवीपर्यंतचे वर्ग उपलब्ध नसतील, तर चौथी किंवा सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यावर आठवीच्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी १ ते ३ किलोमीटर अंतर ओलांडून जाण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी शासन नियमांची मोडतोड करणार आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.