भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार गोरेगाव पश्चिम येथे घडला आहे. याप्रकरणी शाहबाज निजाम शेख ऊर्फ आदिल या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम प्रभाकर बांगर हे बांगुरनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. बुधवारी (ता. 10 एप्रिल) रात्री उशिरा ते महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी गोरेगाव येथील लिंक रोड, स्नेहा बारसमोर वाहतूक विस्कळीत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे दोन तरुण आपापसात हाणामारी करत होते. एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याने तिथे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे त्यांनी या दोघांची समजूत काढून त्यांच्यात भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपी आदिल याने पोलीस हवालदार यांना शिवीगाळ करुन पोलिसांविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर त्याने त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर शिवराम बांगर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बळाचा वापर करुन आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले. यानंतर चौकशीत त्याचे नाव शाहबाज शेख ऊर्फ आदिल असल्याचे उघडकीस आले. तो व्यावसायिक असून तो ओशिवरा येथील गावदेवी इमारतीमध्ये राहतो.याप्रकरणी शिवराम बांगर यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करुन मारामारी करणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यामध्ये आरोपी आदिल याला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला काल गुरुवारी (ता. 11 एप्रिल) दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.