Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता अख्खा महाराष्ट्र फिरा फक्त 1170 रुपयात, ST कडून स्पेशल पासची सुविधा

आता अख्खा महाराष्ट्र फिरा फक्त 1170 रुपयात, ST कडून स्पेशल पासची सुविधा 


शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा प्लान करत आहेत. तसेच हा पर्यटनाचा देखील काळ आहे. या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात.

तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण येथे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या म्हणजेच एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती देत आहोत. या पासच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ "आवडेल तेथे कोठेही प्रवास" या योजनेअंतर्गत प्रवाशांना राज्यभर अतिशय अल्प दरात फिरण्याची संधी उपलब्ध करून देते. ही योजना 1988 पासून प्रवाशांसाठी राबवली जात आहे. या योजने अंतर्गत 7 दिवस आणि 4 दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो. यात साध्या आणि शिवशाही या दोन्ही प्रकारच्या बसमधून तुम्ही प्रवास करू शकता. परंतु त्यासाठी पासचे दर वेगवेगळे आहेत. साध्या बसेसमध्ये साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती (मिडी) आंतरराज्य या बसेसचा समावेश आहे. तर शिवशाही शिवशाही (आसनी) बससाठी पासचे दर वेगळे आहेत. 

प्रौढांसाठी, मुलांसाठी किती दर?

या योजनेअंतर्गत मुलांना आणि प्रौढांसाठीच्या पासच्या किमती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही चार दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला 1170 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 585 रुपये द्यावे लागतील. हीच 4 दिवसांची शिवशाहीची पास घेतल्यास प्रौढांसाठी 1520 आणि लहान मुलांसाठी 765 रुपये द्यावे लागतील. याशिवाय तुम्ही सात दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला 2040 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 1025 रुपये द्यावे लागतील. हीच 7 दिवसांची शिवशाहीची पास घेतल्यास प्रौढांसाठी 3030 आणि लहान मुलांसाठी 1520 रुपये द्यावे लागतील. हे लक्षात घ्या की लहान मुलांच्या पासाचे दर हे 5 वर्षापेक्षा जास्त आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. पाच वर्षांच्या आतील मुलांना एसटी बस प्रवासात कोणतेही तिकिट लागत नाही. तर 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फूल तिकिट काढावे लागेल.

कुठे काढता येईल पास?

तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो. याव्यतिरिक्त या योजनेत आंतर-राज्य प्रवास देखील समाविष्ट आहे. ही पास मिळविण्यासाठी तुम्ही एसटी आगर येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑफलाइन फॉर्म पूर्ण करू शकता. पाससाठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या की, तुमच्याकडून पास हरवला तर डुबलीकेट पास मिळत नाही, तसेच हरवलेल्या पासवर कोणताही परतावा दिला जाणार नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.