Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे -कलेक्टर साहेबांचा पारा चढला अन.. एका झटक्यात 32 बारच्या परवाण्यावर मारली ' लाल फुली '!

पुणे -कलेक्टर साहेबांचा पारा चढला अन.. एका झटक्यात 32 बारच्या परवाण्यावर मारली ' लाल फुली '!


पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन अतिवेगाने गाडी चालवित दुचाकीला उडविले. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांना कोणतीही खातरजमा न करता दारू पुरविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सतर्क झालेल्या जिल्हाप्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्य शुल्क विभागाने पुणे शहरासह जिल्ह्यातील 32 परमिट रूम आणि बारचे परवाने रद्द केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.


कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली होती. पोर्श कारने ही धडक दिली होती. त्यानंतर या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याच्या प्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबवर कारवाई करत हे पब बंद करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिवसे यांनी हे आदेश दिले होते.

या घटनेनंतर पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व पब, परमिट रूम, बारची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी केल्या होत्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. मध्यरात्री 1.30 नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. महिला वेटर्समार्फत रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून बार, पब तसेच परमिट रूमची तपासणी केली जात होती. यामध्ये तीन दिवसांत पुणे शहरासह जिल्ह्यातील 32 परमिट रूम आणि बारचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दिवसे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

या कायद्यानुसार होणार कारवाई
बॉम्बे प्रोहिबिशन कायदा 1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम 1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. जे बारमालक, हॉटेल चालक तसेच, पब त्यांना घालून दिलेल्या अटी आणि नियमांची पुर्तता करणार नाहीत. त्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करत त्यांना मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.