Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अब की बार 400 पार! भाजपाला घोषणा बाजूला ठेवण्याची वेळ

अब की बार 400 पार! भाजपाला घोषणा बाजूला ठेवण्याची वेळ 


देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातला प्रचार थांबला. राज्यात उद्या 11 जागांवर मतदान होईल. यातील बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहे. साखर पट्ट्यात कोणाच्या तोंडात साखर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. कोल्हापूर, हातकणंगलेत शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. राज्यात भाजप पहिल्यांदाच 28 जागांवर लढत आहे. पण मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपवर 'अब की बार 400 पार'ची घोषणा बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे.


देशभरातील मित्रपक्ष भाजपची डोकेदुखी वाढवत आहे. भाजपप्रणित एनडीएमध्ये 40 पक्ष आहेत. ते 100 जागांवर लढत आहेत. मात्र त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे भाजप नेतृत्त्वाला वाटते. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. पैकी 20 जागा मित्रपक्ष लढवत आहेत. शिंदेसेना 15, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, तर राष्ट्रीय समाज पक्ष 1 जागेवर लढत आहे.

गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी मिशन 45 आखण्यात आले आहे. पण बहुतांश सर्व्हे पाहता महायुतीला 40 पेक्षा जास्त जागा जिंकताना दिसत नाही. महायुतीला 28 ते 30 जागा मिळताना दिसत आहेत. भाजपची कामगिरी चांगली असेल, असे सर्व्हे सांगतात. पण मित्रपक्षांना फारसे यश मिळणार नाही, असे अंदाज आहेत. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यापैकी 23 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. पण ते एकत्रितपणे प्रचार करु शकत नाही. लोकजनशक्ती (रामविलास) पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी 2020 च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्यामुळे जनता दलाला बऱ्याच जागांवर फटका बसला. 2015 मध्ये 71 जागा जिंकणारा जनता दल 43 जागांवर आला. त्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमारांनी पासवान यांना माफ केलेलं नाही. चिराग पासवान यांचा पक्ष 5 जागा लढवत आहे. आरएलएम आणि हम यांच्यापुढेही आव्हान आहे. जदयू लढत असलेल्या 16 जागांपैकी अनेक जागा अडचणीत आहेत.

कर्नाटकात सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानं देवगौडा यांचा जनता दल सेक्युलर पक्ष भाजपसाठी अडचणीचा ठरत आहे. कर्नाटकात भाजपने 2019 मध्ये 25 जागा जिंकल्या होत्या. पण सेक्स स्कॅण्डलमुळे भाजप आणि मित्रपक्षांना फटका बसू शकतो. त्यामुळे मागील कामगिरीची पुनरावृत्ती अवघड आहे. उत्तर प्रदेशात भाजपने मित्रपक्षांना 6 जागा सोडल्या आहेत. 2019 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात 64 जागा जिंकल्या होत्या.

खाते उघडले जाणार

आंध्र प्रदेशात भाजपला चांगल्या कामगिरीची आशा आहे. युतीतील सहकारी पक्ष एकत्र काम करत असल्यानं लोकसभेच्या 25 जागांपैकी बहुतांश जागा जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे. तमिळनाडू, केरळमध्ये यंदा खाते उघडले जाईल असा आशावाद भाजपला आहे. आठ छोट्या पक्षांसह भाजप इथे लढत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.