आग्रा : वडील आणि मुलाचं नातं खूप घट्ट असतं. या नात्यातही मैत्री असते आणि म्हातारपणात मुलगा आधार देईल अशी अपेक्षा असते. पण आग्रामध्ये लीला नावाच्या एका मुलाने या नात्याला कलंकित करणारे कृत्य केले आहे. मुलाने त्याचे वृद्ध आणि आजारी वडील छत्रपाल यांना गांधी चौकात रस्त्यावर सोडून दिलं. यानंतर आग्रा पोलीस देवासारखे धावून आले आणि त्यांनी आधी वृद्धावर उपचार करून त्यांना घरी सोडलं.
शमसाबाद भागातील हे प्रकरण आहे. इरादतनगरच्या सादुपुरा गावात राहणाऱ्या छत्रपाल यांची तब्येत खूप दिवसांपासून खराब होती. घरीच उपचार चालू होते, मग त्यांच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली मुलगा लीलाने त्यांना कम्युनिटी सेंटरमध्ये आणलं. नंतर गांधी चौकात एकेठिकाणी बसवून थोड्या वेळात परत येईन असं सांगून निघून गेला. वडील मुलाची वाट पाहत होते, पण तो आलाच नाही.
त्यांना रडताना पाहून तिथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना कळवलं. मग पोलिसांनी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेलं आणि नंतर त्यांच्या घरी पोहोचवलं. पोलिसांना पाहताच घरात उपस्थित असलेल्या मुलाने पळ काढला. या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी वृद्ध वडिलांना त्यांच्या घरी सोडले असून कुटुंबियांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर ते वृद्ध वडीलही पोलिसांचे आभार मानताना दिसले.
पोलीस काय म्हणाले?
शमसाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी वीरेश पाल गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी पोहोचल्यानंतर वृद्धाला खूप बरं वाटलं. वडिलांना निराधार सोडून पळून गेलेल्या मुलाला धडा मिळाला आहे. आता तो पुन्हा ही चूक करणार नाही. पोलीस अशी कामं करत राहतात, पण ती क्वचितच मीडिया किंवा लोकांसमोर येतात. या प्रकरणातही पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर त्या आजारी वडिलांवर उपचार झाले नसते. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कडक उन्हात त्यांची तब्येत बिघडू शकली असती.
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांना भरणपोषणाचा हक्क
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, 2007 हा भारत सरकारचा एक कायदा आहे. यात वृद्ध व्यक्ती आणि पालकांच्या देखभालीची आणि भरण-पोषणाची तरतूद आहे. हे विधेयक सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आणलं होतं. जे आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या उत्पन्नातून किंवा त्यांच्या संपत्तीतून स्वतःची देखभाल करू शकत नाहीत, ते त्यांच्या प्रौढ मुलांकडून भरणपोषणासाठी अर्ज करू शकतात, अशा तरतुदी या कायद्यात आहेत.
... तर होऊ शकते शिक्षा
यामध्ये 'पालक' म्हणजे सख्खे, दत्तक आणि सावत्र आई आणि वडील यांचा समावेश होतो. तरतुदीनुसार, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ज्याचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते त्यांच्या संपत्तीचे वारसदार असलेल्या नातेवाईकांकडून देखभालीच्या खर्चाची मागणी करू शकतात. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करणं, त्यांना घराबाहेर काढणं, वाऱ्यावर सोडून देणं हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी 5000 रुपये दंड किंवा तीन महिने कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मासिक देखभालीसाठी कमाल 10 हजार रुपये देण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.