Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांवर कारवाई होते मग एक्साईजचे अधिकाऱ्यांवर का नाही?पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण

पोलिसांवर कारवाई होते मग एक्साईजचे अधिकाऱ्यांवर का नाही?पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण 


पुणे :  पुण्यातील कल्याणीनगर भागात पबमध्ये दारू ढोसून भरधाव वेगाने पोर्शे कार चालवणाऱ्या बिल्डरच्या अल्पवयीन (?) मुलाने दोघांचा बळी घेतला. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून सर्व स्तरातून पोलिसांवर टीकेची झोड उठल्यानंतर पोलिस आयुक्तांनी पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकाला निलंबित केले आहे. याप्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्यात आली. मात्र बारमध्ये अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

रविवारी मध्यरात्री बिल्डरपुत्राने दारूच्या नशेत आलिशान पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत कल्याणीनगर येथे दुचाकीवरील दोघांना अक्षरशः उडवले होते. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर बैल गेला अन झोपा केला या म्हणीप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली. सोमवारी या विभागाने तातडीने बिल्डरपुत्राने दारू प्राशन केलेल्या मेरियट सुटसमधील ब्लॅक आणि कोझी रेस्टोरेंटमध्ये छापा टाकला. यावेळी अल्पवयीन मुलांना बेकायदीशीररित्या मद्य पुरवल्याप्रकरणी मेरियट सुटसचे मालक सागर चोरडिया तसेच कोझी बारचे मालक प्रल्हाद भूतडा यांच्याविरोधात घाईघाईने आरोपपत्रही न्यायालयात सादर केले. 
सोमवारपासून हे अपघात प्रकरण चांगलेच पेटले. गृहमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी पुण्याकडे धाव घेतली. यात अनेकांनी राजकीय पोळ्याही भाजून घेतल्या. या प्रकरणात राजकीय नेत्यांची एंट्री झाल्यानंतर या सर्व प्रकाराला पोलिसच जबाबदार असल्याचे प्रकार्षाने नागरिकांचा समज करून देण्यात आल्याचे दिसून येते. मात्र कल्याणीनगरमधील संबंधित पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य पुरवले जाते याबाबत कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहेत. या विभागाने अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणाऱ्या पब, बारवर यापूर्वीच कारवाई करणे अपेक्षित होते मात्र ती झाली नसल्यानेच कल्याणीनगरमधील अपघाताचा हा प्रकार झाल्याचा सूरही पुणेकरांमधून ऐकायला मिळत आहे. 

या अपघातानंतर पोलिसांना दोषी धरून वरीष्ठांना घटनेची माहिती न दिल्याच्या कारणावरून दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मात्र पब, बारमध्ये जर अल्पवयीन बिल्डरपुत्राला मद्य पुरवण्यात आले नसते तर हा अपघात झाला नसता अशीही चर्चा आहे. त्यामुळे या अपघातप्रकरणी फक्त पोलिसांवरच कारवाई का राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.