Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटील यांची बंडखोरी सांगलीत इतिहास घडविणार?

विशाल पाटील यांची बंडखोरी सांगलीत इतिहास घडविणार?


सांगली लोकसभा मतदारसंघात १९५१ पासून २०१९ पर्यंतच्या ६८ वर्षांत ८१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांसह २० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत; पण, बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी इतिहास घडविणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सांगली लोकसभेची पहिली निवडणूक १९५१ मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव पिराजीराव पवार यांनी एकूण मतांच्या ५९.८० टक्के मते घेऊन विजयी झाले होते. या निवडणुकीत दोन अपक्षांना केवळ ७.८८ टक्के मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. लोकसभेची दुसरी निवडणूक बळवंत ऊर्फ बाळासाहेब पाटील आणि विठ्ठल पागे अशी दुरंगी झाली. पाटील यांना ५३.७२ टक्के, तर पागे यांना ४६.२८ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत तिसरा उमेदवारच नव्हता.


१९६२ आणि १९६७ च्या निवडणुकीत प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात होते. त्यांपैकी प्रत्येकी दोन उमेदवारांची अनामत जप्त झाली. १९७७ ते १९८४ या कालावधीत चार वेळा निवडणुका झाल्या असून, चारही निवडणुका दुरंगीच झाल्या. तिसरा उमेदवारच मैदानात नव्हता. यामध्ये १९८०ची निवडणूक वसंतदादा पाटील विरुद्ध विश्वासराव पाटील अशी झाली होती. यामध्ये वसंतदादांनी ६९.७४ टक्के, तर विश्वासराव पाटील यांनी ३०.२६ टक्के मते घेतली होती.

२००६ अन् २००९ ची निवडणूक लक्षवेधी..

१९५१ ते २०१९ या ६८ वर्षांच्या कालावधीत ८१ अपक्षांसह छोट्या पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. २००६ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील आणि २००९ च्या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. या निवडणुकीत त्यांनी अनामत रक्कम वाचविण्यात यश मिळविले. गेल्या ६८ वर्षांत लोकसभा निवडणुकीत अपक्ष विजय खेचून आणण्यात अपयशी ठरले. २०२४ च्या निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत विशाल पाटील इतिहास घडविणार का? अशी मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीची अनामत रक्कम किती ?

लोकसभा निवडणुकीत सध्या सामान्य श्रेणी आणि एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित केलेली असते. लोकसभा निवडणुकीसाठी सामान्य श्रेणीच्या उमेदवारासाठी अनामत २५ हजार रुपये आहे, तर एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवारांसाठी १२,५०० इतकी आहे.

घोरपडे, दिनकर पाटलांची अनामत वाचली

सांगली लोकसभेसाठी २००६ मध्ये काँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून दिनकर पाटील यांनी निवडणूक लढविली होती. यामध्ये प्रतीक पाटील यांना एकूण मतांच्या ४१.९३ टक्के मते घेऊन ते विजयी झाले. दिनकर पाटील यांना २८.५८ टक्के मते मिळाल्यामुळे ते अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी ठरले. पुढे २००९ मध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी प्रतीक पाटील यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविली. यामध्ये ४३.६२ टक्के मते घेतल्यामुळे त्यांचीही अनामत रक्कम वाचली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.