कवयित्री मानसी राहुल नेवगी लिखित साहित्यसंपदा प्रकाशित ' मनमानसी ' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सांताकृझ, मुंबई येथे दिनांक १ मे २०२४ रोजी पार पडला .साहित्यसंपदा प्रकाशन संस्थेचे हे ७५ वे पुस्तक ठरले . या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी होते साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी मा. एकनाथ आव्हाड सर तसेच निमंत्रित अतिथी नाट्य , चित्रपट कलाकार मा. गणेश मयेकर , साहित्यसंपदा संस्थेचे संस्थापक मा . वैभव धनावडे , राजे संभाजी विद्यालयाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका मा. पूजा विश्वनाथ महाडेश्वर , अवर सचिव (मंत्रालय ) मा. संजय महाडेश्वर या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात गार्गी गणेश मयेकर हिच्या नृत्यातून सादर केलेल्या गणेशवंदनेतून झाली . यानंतर अतिथींचा सत्कार झाला व पुस्तकाचे प्रकाशन पार पडले . प्रमुख अतिथी मा. एकनाथ आव्हाड यांनी अध्यक्षीय भाषणात ' मनमानसी ' पुस्तक म्हणजे अर्थांच्या विविध छटा असणारा काव्यसंग्रह असे गौरवोद्गार काढले . तसेच प्रत्येक वाचकाला पुस्तकातील प्रत्येक कविता वेगळं काहीतरी सांगते , वेगवेगळ्या अर्थातून बोलते यात कवयित्री यशस्वी झाल्या आहेत . पहिला काव्यसंग्रह असला तरी कविता नवख्या वाटत नाहीत त्या परिपक्व वाटतात असेही ते म्हणाले. साहित्यसंपदाचे संस्थापक मा. वैभव धनावडे यांनी आपल्या भाषणात 'मनमानसी '
काव्यसंग्रहाचा 'जाणिवांचे पुस्तक' असा उल्लेख केला तसेच प्रत्येक कवितेसाठी रेखाटलेली समर्पक चित्रे, मुखपृष्ठ , मलपृष्ठ या वैशिष्ट्यांकडेही लक्ष वेधले व चित्रे व मुखपृष्ठांची संकल्पना मांडणाऱ्या मनस्वी राहुल नेवगी हिचेही कौतुक केले. राहुल नेवगी यांच्या सहकार्याशिवाय हा सुंदर कार्यक्रम होणे शक्य नव्हते असेही ते म्हणाले. मा. गणेश मयेकरांनी शुभेच्छा दिल्या व पुस्तकातील त्यांना आवडलेल्या कवितेचे वाचन केले. माजी नगरसेविका व राजे संभाजी विद्यालयाच्या अध्यक्षा मा.पूजा महाडेश्वर व अवर सचिव (मंत्रालय ) मा.संजय महाडेश्वर यांनी काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या. 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेचे दिग्दर्शक प्रथमेश परब यांनी काव्यरुपी शुभेच्छा दिल्या .मान्यवरांची मनोगते , सान्वी नेवगी व ओवी मयेकर यांनी केलेले बालकवितांचे वाचन, कवी श्रीकांत पेटकर, कवयित्री वैशाली कदम , कांचन महाडेश्वर , किमया गावडे यांचे काव्यवाचन, सुभाष महाडेश्वर यांच्या स्वलिखित मालवणी कवितेचे सादरीकरण कवयित्री सलोनी बोरकर यांचे गीतगायन अशा सुरेख वातावरणात हा सुंदर सोहळा पार पडला. आपल्या उत्तम सूत्रसंचलनाने रश्मी मयेकर ह्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. मराठी वाचन संस्कृतीस 'मनमानसी' सारख्या काव्यसंग्रहाने बळ लाभत राहील अशा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मानसी नेवगी ह्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.