Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'महाड हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून संबंधीत अधिकाऱ्यांना निलंबित करावे '

'महाड हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून संबंधीत अधिकाऱ्यांना निलंबित करावे '


महाड : श्रीकृष्ण दबाळ आज (शुक्रवार) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना बारामती येथे नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर हेलीपॅडचा अंदाज न आल्याने क्रॅश झाले.
सुदैवाने त्‍यावेळी सुषमा अंधारे या हेलिकाप्टरमध्ये नव्हत्‍या. त्‍या आपल्‍या गाडीतच बसल्‍या होत्‍या. मात्र या घटनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे महाड शहरातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे.

श्रीमती सुषमा अंधारे यांनी हेलीपॅड संदर्भातील सर्व शासकीय परवानग्या घेतल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्याचा उल्लेख करून संदीप जाधव यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांच्याकडून करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या दुर्घटणेनंतर जवळपास दीड तासानंतर आरोग्य विभागाची संबंधित यंत्रणा या ठिकाणी दाखल झाल्याचे सांगून हा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना प्राप्त झाली नव्हती. परवानगी घेतल्यानंतर फायर टँकर त्या ठिकाणी पाठवण्याकरता चार हजार रुपये भरून ती व्यवस्था पालिका प्रशासनामार्फत केली जाते, मात्र याबाबत कोणतीही सूचना नगरपालिका प्रशासनाला देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या ठिकाणी प्रांताधिकारी डॉक्टर बानापुरे उपस्थित असून, त्यांनी सुद्धा प्रत्यक्षात हेलीपॅडच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर या प्रकरणी भाष्य करू असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. एकूणच आगामी काळात या दुर्घटने संदर्भात मोठे रणकंदन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.