Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाढलेली टक्केवारी आम्ही जाहीर केलेली नाही :- चोक्कलिंगम

वाढलेली टक्केवारी आम्ही जाहीर केलेली नाही :- चोक्कलिंगम 


राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात मतदान झाल्यानंतर त्या दिवशी दिलेली आकडेवारी आणि नंतर दिलेल्या अंतिम आकडेवारीत फरक स्पष्टपणे दिसून आल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे; पण आकडेवारीतील या संशयास्पद तफावतीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज पूर्णपणे मौन बाळगले. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीची आकडेवारी आम्ही जाहीर केली नसल्याने आम्ही त्याबाबत काही उत्तर देऊ शकत नाही. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्तच सांगू शकतील, अशी सारवासारव करत निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी हात वर केले. त्याचवेळी मतदानानंतरची आणि प्रत्यक्षातील आकडेवारीत 1 ते 5 टक्क्यांपर्यंत फरक येऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यानंतर दहा दिवसांनी निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये तफावत आढळून आली. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात मतदानादिवशी संध्याकाळी सहा वाजता जाहीर केलेली टक्केवारी आणि मतदानाची अंतिम टक्केवारी यामध्ये सरासरी 5.87 ते 7.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत एस. चोक्कलिंगम यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी तांत्रिक माहिती देण्यास सुरुवात केली.

ज्या दिवशी मतदान पार पडत असते त्या दिवशी सकाळपासून विविध टप्प्यांत मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येत असते. ही टक्केवारी ढोबळ स्वरूपाची असते. मतदानाच्या दुसऱया दिवशी रात्री जी 'एंड ऑफ पोल' आकडेवारी येते तीच अंतिम असते. तसेच मतदानाच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रतिनिधींना फॉर्म 17 क नुसार संबंधित मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची अचूक आकडेवारी देण्यात येते. ही आकडेवारी त्याचवेळी सीलबंद करण्यात येते. नंतर कोणीही ही आकडेवारी अंतिम एकूण आकडेवारीशी पडताळून पाहू शकतो. त्यात कोणतीही गोपनीयता नाही. त्यामुळे आता झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत नंतर अचानक वाढ झाली असे कोणी म्हणू शकत नाही, असे चोक्कलिंगम म्हणाले.

आम्ही उत्तर देऊ शकत नाही!

मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीबद्दल पत्रकारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे पत्रकारांनी पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा चोक्कलिंगम यांनी मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाची उत्तर देण्याची एक क्षमता असते. अकरा दिवसांनंतर आम्ही आकडेवारी जाहीर केली नसल्याने त्याबाबत आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. मतदानाच्या पावित्र्यावर पत्रकारांनी बोट ठेवले असता केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने मतदानातील तफावतीच्या प्रश्नावर उत्तर देणे अपेक्षित आहे. ते प्रश्न मला विचारू नका. मी राज्य निवडणूक विभागाचे प्रतिनिधित्व करतो, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.