परभणी: नाव्हा (ता. पालम, जि. परभणी) येथे ऑनर किलींगचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आंतरजातीय प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनी भावकीतील अन्य सहा जणांच्या सहाय्याने तिचा खून केला. आणि तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. ही घटना दि. २१ ते २२ एप्रिल २०२४ या कालावधीत घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर आई वडिलासह ८ जणांवर खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आज (दि.3) पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गंगाराम गाडेवाड (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. साक्षी बाळासाहेब बाबर (वय १९, रा. नाव्हा, ता. पालम, जि. परभणी) असे मृत तरुणीचे नाव आहे.
संशयित आरोपींची नावे –
वडील बाळासाहेब भिमराव बाबर, आई रुख्मिनीबाई बाळासाहेब बाबर, अच्युत दत्तराव बाबर, राजेभाउ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, आबासाहेब रुस्तुमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक शिंदे (सर्व रा. नाव्हा ता. पालम, जि. परभणी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, साक्षी बाळासाहेब बाबर हिचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे साक्षीने आंतरजातीय विवाह करु नये, असे मत तिच्या आई वडिलांचे होते. परंतु, साक्षी त्या मुलासोबतच लग्र करण्यावर ठाम होती. त्यामुळे दि. २१ एप्रिलरोजी रात्री १० ते दि. २२ एप्रिलरोजी पहाटेच्या दरम्यान नाव्हा येथे तरुणीच्या आई-वडिलांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला ठार केले.
मुलीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून टाकला
आणि त्याच रात्री कोणालाही माहिती होवू न देता भावकीतील निवडक लोकांना त्यांनी समवेत घेऊन संगनमत केले. मुलीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून तो पुरावा नष्ट केला. त्या मुलीचा अंत्यविधी नातेवाईक करत असताना अनेकजण तेथे हजर होते. पण त्यांना या अपराधाची माहिती असतानाही त्या लोकांनी पोलिसांना याबाबत न कळवता सदर अपराधास मदत केल्याने पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालस पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.