Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परिचारिका दिनानिमित्त सांगलीत परिचारिकांचा सन्मान

परिचारिका दिनानिमित्त सांगलीत परिचारिकांचा सन्मान 


सांगली : अंथरुणावर खिळलेल्या आणि आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असणार्‍या वृद्धांना आपल्या आई-वडिलांसमान मानून त्यांची आस्थेनं सेवा शुश्रुषा करणार्‍या संवेदना वृद्धसेवा केंद्रातील परिचारकांच्या सेवेचे मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विक्रम सिंह कदम यांनी काढले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवेदनामध्ये आयोजित केलेल्या परिचारिकांच्या सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की, दरवर्षी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपण जाणतो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमिअन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करत हिंडणारी आद्य परिचारिका यांचा हा जन्मदिवस. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी नर्सिंगच्या आधुनिक पद्धतींचा पाया रचला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. 'आमच्या नर्सेस… आमचे भविष्य.. काळजी घेणारी आर्थिक शक्ती' अशी यावर्षीच्या जागतिक परिचारिका दिनाची थीम ठरवण्यात आली आहे. त्यामुळे परिचारिकांच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठीही समाज म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुरुवातीला फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संवेदनातील सर्व परिचारिका व आया मावश्या यांचा डॉ. कदम यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अरविंद कुलकर्णी, डॉ अजित भरमगुडे, डॉ देवपाल बरगाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. काजल पवार, माधुरी कुमरे, श्रुती पाटील, आदित्य आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ दिलीप शिंदे यांनी स्वागत केले. डॉ नीलम शिंदे यांनी आभार मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.