Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूमुळे होणारा लिव्हर फेल्यूअरचा धोका कमी करायचाय? ही फळं खावा

दारूमुळे होणारा लिव्हर फेल्यूअरचा धोका कमी करायचाय? ही फळं खावा 


बदलत्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. आजकाल मद्यपान फॅशन बनले आहे. वीकेंडला आवर्जून मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात हार्ड ड्रिंक घेणारेदेखील बहुसंख्य असतात; पण हार्ड ड्रिंक शरीरासाठी अत्यंत घातक असतं. फॅशन किंवा मनोरंजनाच्या नावाखाली मद्यपान करणं भविष्यात जीवघेणं ठरू शकतं. मद्यपानामुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो, ते सविस्तर जाणून घेऊ या.

सप्ताहातले पाच दिवस भरपूर काम आणि मग दोन दिवस पूर्ण एन्जॉय असा ट्रेंड आजकाल पाहायला मिळतो. हा ट्रेंड प्रामुख्याने मेट्रो सिटीमध्ये आहे. युवा पिढीत या ट्रेंडची खूप क्रेझ आहे. वीकेंड पार्टीत खाणं-पिणं, डान्स आदी गोष्टी समाविष्ट असतात. या सगळ्यात हार्ड ड्रिंकला जास्त पसंती दिली जाते. आज जरी मद्यपान आनंददायी वाटत असलं तरी ते तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम करत असतं.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अॅब्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त पेग मद्यपान केल्याने रक्तातल्या अल्कोहोलचं प्रमाण 0.09 टक्क्यांनी वाढतं. तसंच शुगर लेव्हल सुमारे दोन टक्क्यांनी वाढते. जेव्हा मद्याचा प्रभाव कमी होतो, तेव्हा शुगर लेव्हल कमी होते. त्यामुळे काही वेळा हायपोग्लायसेमियासारखी स्थिती निर्माण होते. याला लो ब्लड शुगर असंही म्हणतात. मद्यपानामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. फिजिशियन संजय महाजन यांनी सांगितलं, की अति मद्यपान शरीरासाठी हानिकारक असतं. अल्कोहोलमुळे लिव्हर किंवा पोटाशी संबंधित आजार होतातच; पण यामुळे संधिवात आणि लठ्ठपणा होऊ शकतो. अल्कोहोल जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. त्यामुळे थकवा, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवतात.


मद्यपानामुळे लिव्हरचं आरोग्य बिघडतं. याबाबत मॅरिंगो एशिया हॉस्पिटल्सचे लिव्हर ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. पुनीत सिंगला यांनी सांगितलं, की मद्यपानामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ शकतं. याला फॅटी लिव्हर (लिव्हरचा आकार वाढणं) असं म्हटलं जातं. यामुळे लिव्हरला आतून सूज येते. ही सूज कायम राहिली तर फायब्रॉसिस किंवा सिऱ्हॉसिस होऊ शकतो. मद्यपानामुळे लिव्हर खराब झाल्याची तक्रार घेऊन आमच्या ओपीडीत दर महिन्याला सुमारे 100 रुग्ण येतात. यापैकी सुमारे दहा टक्के रुग्णांमध्ये लिव्हर फेल्युअरचं निदान होते. त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज असते. यापैकी बहुतांश रुग्ण 25 ते 50 वर्षं वयोगटातले असतात.

सुरुवातील लिव्हर फेल्युअरची फारशी लक्षणं दिसत नाहीत. अल्ट्रासाउंड तपासणीत फॅटी लिव्हर किंवा लिव्हरच्या तपासणीत सूज दिसते. लिव्हर फेल्युअर झालं, तर कावीळ, पायांना सूज, पोटात पाणी होणं, मेंदूवर परिणाम होणं, संभ्रम निर्माण होणं, स्नायू अशक्त होणं असा त्रास होऊ शकतो. जर दीर्घ काळ मद्यपान केलं तर लिव्हर खराब होऊ शकतं. लठ्ठपणा असेल आणि व्यायाम करत नसाल पण मद्यपान करत असाल तर लिव्हर फेल्युअरचा धोका वाढतो.

लिव्हरचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करावा. लिंबू, संत्री, अननस या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. हे व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा.


मद्यपानामुळे लिव्हरचं नुकसान होतं. यामुळे लिव्हर कॅन्सर देखील होऊ शकतो. अशा स्थितीत हळदीचं सेवन उपयुक्त ठरतं. हळदीमुळे कॅन्सरला मदत करणाऱ्या घटकांचा प्रभाव कमी होतो. सफरचंदात पेक्टिनसह इतर रासायनिक घटक असतात. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि पचनाला मदत होते. त्यामुळे हेदेखील आहारात समाविष्ट करावं.

आरोग्य चांगलं राहावं, यासाठी मद्यपान करू नये. रोज नियमित 30 ते 40 मिनिटं व्यायाम करावा. वजन नियंत्रणात ठेवावं. वर्षातून एकदा लिव्हरशी संबंधित तपासण्या करून घ्याव्यात. लिव्हर आरोग्यदायी राहील असे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.