Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधीचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? 'या' 3 तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा

राहुल गांधीचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? 'या'  3 तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा 


लोकसभा निवडणूक पार पडून देशात पुन्हा एकदा एनडीएचं (राष्ट्रीय लोकशही आघाडी) सरकार आलं आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत. तसेच त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही पार पडलं आहे.

दरम्यान, येत्या २४ जूनपासून १८ व्या संसदेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे, जे ३ जुलैपर्यंत चालेल. या नऊ दिवसांच्या विशेष अधिवेशनात लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल, सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. तसेच विरोधी पक्षनेत्याची निवडही केली जाईल. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्या १० वर्षांपासून रिकामं आहे. दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज या शेवटच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. २००९ ते २०१४ या काळात त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. २०१४ पासून हे पद रिकामं आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाने लोकसभेच्या एकूण जागांपैकी (५४३) किमान १० टक्के जागा म्हणजेच ५४ किंवा त्याहून अधिक जागा जिंकणं आवश्यक असतं. मात्र २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणताही पक्ष ५४ किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकला नव्हता. २०१४ मध्ये काँग्रेस देशातला दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. या पक्षाचे केवळ ४४ खासदार निवडून आले होते. तर २०१९ मध्ये काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पदावर दावा करता आला नव्हता. यावर्षी काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून कोणत्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीच या पदावर निवड होईल अशी गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. मात्र एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की राहुल गांधी यांनी हे पद नाकारलं आहे. त्यांच्याऐवजी काँग्रेसकडून इतर तीन नावांची चर्चा चालू आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी ९९ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. लोकसभेच्या एकूण जागांपैकी १८ टक्के जागा जिंकत काँग्रेसने या पदावर त्यांचा दावा सिद्ध केला आहे. काँग्रेसकडून हे पद राहुल गांधींना मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांनी हे पद घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या नकारानंतर पक्षातील तीन नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय चालू आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्या कुमारी शैलजा, गौरव गोगोई आणि मनीष तिवारी या तीन नावांचा पक्षश्रेष्टी विचार करत आहेत. गौरव गोगोई आसामच्या जोरहाटमधून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. तसेच ते गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचं नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. कुमारी शैलजा या हरियाणातील सिरसा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर मनीष तिवारी यांनी चंदीगढ लोकसभा जिंकली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.