कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठलेही पक्ष उमेदवार उभे करून समाजात विशिष्ट संदेश देतात, तसेच मतदारही मतदानाचा कौल देऊन राजकीय पक्षांना तो संदेश परतावून लावतात. असाच एक "संदेश" महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिला गेला आहे, तो "संदेश" म्हणजे "फुटा, पण राज्य करा"!!, हा आहे.
इंग्रजांनी भारतामध्ये "फोडा आणि झोडा" या नीतीने राज्य केले. ते भारतीय राज्यकर्त्यांनी आत्मसात करून गेली 70 वर्षे "तसे" राज्य केले. यात काही सन्माननीय अपवाद निघाले. पण मुळात "फोडा आणि झोडा" ही राजनीती संपू शकली नाही.
याचे नवे रूप महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर करून महाराष्ट्रात किमान बारामतीत तरी "फुटा, पण राज्य करा!!" हा राजकीय संदेश दिला आहे. तो अख्ख्या पवार कुटुंबाचा राजकीय संदेश आहे. 11 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली. काका आणि पुतणे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले. इतरांची घरे फोडणाऱ्या पवारांच्या घरात फूट पडल्याचे वर्णन करून झाले. 11 महिन्यांनी लोकसभेचे निकाल आले. त्यामध्ये बाहेरून आलेल्या पवार पडल्या आणि पवारांच्या घरातून बाहेर गेलेल्या पवार निवडून आल्या. पण म्हणून दोन्ही पवारांचे फारसे काही बिघडले नाही, असाच संदेश राज्यसभा निवडणुकीने दिला. भाजपने अजितदादांचा उंट आपल्या तंबूत घेतला. त्याचा पुरेपूर लाभ त्या उंटाला झाला. चुलत बहीण लोकसभेत आणि पत्नी राज्यसभेत हा तो "लाभ" आहे!!
मग भले काका - पुतण्याच्या पक्षातले नेते काहीही बोलोत, पत्रकार परिषदांमध्ये नाराजी व्यक्त करोत, छगन भुजबळ, रोहित पवार, पार्थ पवार, जयंत पाटील नाराज होवोत किंवा आनंदी होवोत, किंवा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये ताटातले वाटीत होवो किंवा वाटीतले ताटात जावो, "लाभार्थी" पवार ठरले, हे यातले राजकीय सत्य समोर आले!!एरवी पवारांनी इतरांची घरे फोडून "फोडा आणि झोडा नीतीने राज्य केले. त्यावर भाजपच्या नेत्यांनी कायम टीकेची झोड उठवली. त्यानंतर पवारांचे घर फुटले. पण घर फुटूनही पवार "लाभार्थी"च राहिले. कारण "फुटा, पण राज्य करा"!! हा "संदेश" ते निदान बारामतीपुरता देऊ शकले. भाजपने आपल्या तंबूत घेतलेला उंट आपली "करामत" दाखवून गेला!!… दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटींची संपत्ती ईडीच्या ताब्यातून सुटली. राज्यसभेची मुदत संपण्यापूर्वी राजीनामा देऊन त्यांनी आपली नवी मुदत सहा वर्षांसाठी वाढवून घेतली ही "उप करामत" मध्येच घडली!!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.