Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरातील पराभवाबद्दल भाजपकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ठपका

कोल्हापूरातील पराभवाबद्दल भाजपकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ठपका 


कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे पराभूत झाल्यानंतर पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात भाजपचे नेते गुंतले आहेत. या अंतर्गत भाजपने केलेल्या एका खाजगी सर्वेक्षणात मंडलिक यांच्या पराभवाला कागल मधील घटक पक्ष जबाबदार असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बोट गेल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडले आहे. मुश्रीफ यांनी या निष्कर्षाचा इन्कार केला असला तरी हा वाद लगेचच शमण्याची चिन्हे नाहीत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यामध्ये निवडणूक झाली. काँग्रेसचे शाहू महाराज यांनी शिंदे सेनेचे संजय मंडलिक यांचा १ लाख ५४ हजार मतांनी पराभव केला. महायुतीचे कोल्हापुरातील बलाढ्य नेते प्रचारासाठी कार्यरत होते. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. शाहू महाराज यांना उद्देशून गादी – वारस यासारखे संवेदनशील विषय उपस्थित करण्यात आले होते. हिंदुत्ववादाला पूरक अशी प्रचार यंत्रणा कार्यरत होती. मुक्त हस्ते लक्ष्मीदर्शनही करण्यात आले. इतके सारे होऊनही शाहू महाराज यांनी मैदान मारले. त्यामुळे मंडलिक यांचा हा पराभव महायुतीला धक्कादायक ठरला.
साहजिकच त्यावरून पराभव नेमका कसा झाला याचा आढावा घेतला जात आहे. कोल्हापुरात मंडलिक यांच्या उपस्थितीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, दोन्ही आमदार यांच्यासह प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. त्यामध्ये पराभवाची काही प्रमुख कारणे नोंदवण्यात आली होती. दुसरीकडे, भाजपने पराभवाची उकल करण्याचा वेगळा प्रयत्न चालवलेला आहे.

कोल्हापूर भाजपच्या कार्यालयात विधानसभासंघ निहाय आढावा घेतला जात आहे. एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पराभवाची कारणे तपासून पाहिली जात आहे. कागल मतदार संघाचा आढावा घेत असताना येथील घटक पक्ष पराभवास जबाबदार असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. हा निष्कर्ष जितका धक्कादायक तितकाच महायुतीच्या राजकारणात मिठाचा खडा टाकणारा ठरला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील. खासदार धनंजय महाडिक. कागलचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निष्कर्ष नोंदवला गेल्याने मंत्री मुश्रीफ यांच्या विषयी काय भूमिका घ्यायची याची आता पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. राज्याच्या राजकारणात भाजपकडून अजित पवार गटाला डावलले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचीच कोल्हापूर जिल्ह्यातील ही आवृत्ती आहे, किंबहुना त्या दिशेने हा प्रवास सुरू झाला आहे का ? याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. मुश्रीफ यांना उद्देशून असणाऱ्या या टिपणीचा हा एकमात्र फोटो शिस्तबद्ध भाजपच्या बैठकीतून बाहेर पडलाच कसा, त्याचा कर्ता करविता कोण, कोणाकडून हे जाणीवपूर्वक घडवले गेले याचा शोध हा निष्कर्ष जिव्हारी लागलेल्या विरोधकांकडून घेतला जात आहे. एका नव्या वादाची वळणे यामध्ये लपली आहेत.
माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पराभवाला मुश्रीफ हेच कारणीभूत असल्याचा हा निष्कर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात वादाचे तरंग आणणारा ठरला आहे. तथापि हसन मुश्रीफ यांनी याबाबत कानावर बोट ठेवले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पराभवास घटक पक्ष जबाबदार आहेत असे कसे म्हणता येईल. आम्ही ही निवडणूक हातात घेतली होती, अशी टिपणी त्यांनी केली आहे. एरवी कोणताही प्रश्न विचारला कि अघळपघळ बोलण्यासाठी मुश्रीफ ओळखले जातात. मात्र, मंडलिक यांच्या पराभवाच्या मुद्दयावरून मुश्रीफ यांना माध्यमांनी दोनदा बोलते केले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील उमटलेल्या रेषा, त्रासिक भाव चित्रफितीत लपले नाहीत. लोकसभेच्या पराभवास कागल मध्ये घटक पक्ष म्हणजेच हसन मुश्रीफ हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष सर्व्हेतून पुढे आल्यानंतर आता याबाबत भाजप, चंद्रकांत पाटील हे कोणती भूमिका घेणार किंबहुना यावरून महायुतीतील वाद वाढत जाणार का याकडे आता लक्ष वेधले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.