मुलांना नर्सरीमध्ये घालताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
आपली मुलं हुशार आणि कुशाग्र व्हावी असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्यामुळे पालक लहानपणापासूनच त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण लहानपणीची शिकवण मोठ्यापणी कायम राहत असल्यामुळे, मुले मोठी झाल्यावर कशी आणि काय बनतील हे सर्वकाही कोवळ्या वयात मिळालेल्या शिकवणीवर अवलंबून असते. मुलांना चांगला आणि यशस्वी माणूस बनवण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे, आणि त्याची पहिली पायरी म्हणजे प्री-स्कूल.
प्री-स्कूल ही अशी एक शिक्षणपद्धती आहे, ज्यामध्ये मूल त्याच्या वयाच्या इतर मुलांना भेटते आणि नवीन गोष्टी शिकते. असे म्हणता येईल की प्री-स्कूलपासून मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आणि हे मुलांच्या बौद्धिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे आपल्या मुलांसाठी प्री-स्कूल निवडताना पालकांना कोणकोणत्या गोष्टी पाहणे आवश्यक आहे, (How To Choose Pre School for Kid) ते आपण येथे थोडक्यात जाणून घेऊयात.
मुलांसाठी प्री-स्कूल निवडण्यापूर्वी काय पाहणे गरजेचे आहे?
प्री-स्कूल हे शालेय जीवनातील प्रवेश करण्यापूर्वीचे प्रशिक्षण केंद्र असल्या कारणामुळे,तुमच्या मुलाला त्याची आवड निर्माण होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे प्री स्कूल निवडताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की-
प्री स्कूलमधील शिक्षक
तुम्ही प्री स्कूलमध्ये तुमच्या पाल्याला पाठवणार आहात त्या शाळेतील शिक्षक कसे आहेत हे जाणून घेणे देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण प्री-स्कूलच्या माध्यमातून, तुमच्या मुलाला प्रथमच बाहेरील जग पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुलाच्या क्षमता, समस्या आणि गरजा इत्यादींबद्दल शिक्षकांशी मोकळेपणाने बोला.
प्री स्कूलची वेळ
काही प्री-स्कूलमध्ये मुलांना तासन्तास बसवून ठेवले जाते. त्यामुळे प्री स्कूलच्या वेळेकडेही लक्ष द्या. तुमचे मूल लहान आहे त्यामुळे प्री स्कूलमध्ये 2 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणे टाळा. प्री स्कूलची वेळ सकाळचीच चांगली.
प्री स्कूलमधील सुविधा
तुमचे मूल जेव्हा प्री स्कूलमध्ये असेल, तेव्हा ते त्या वेळेमध्ये तुमच्यापासून दूर असणार आहे. त्यामुळे तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा आणि सुरक्षिततेची ठोस माहिती गोळा करणेदेखील तितकेच आवश्यक आहे. प्री-स्कूल असे असावे जेथे मुलाला आरामदायक, सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटेल. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या गरजा लक्षात घेऊनच प्री-स्कूलची निवड करा.
प्री स्कूलमधील अभ्यासक्रम
प्री स्कूलचा अभ्यासक्रम जाणून घ्या, तसेच कोणकोणते विविध उपक्रम आणि वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात ते पहा.
प्री स्कूलची फी
मुलांच्या शिक्षणाचा विचार केला, की पालक खर्चाचा मागेपुढे विचार करत नाही. मात्र, तुम्ही पैसे योग्य ठिकाणी खर्च करत आहात की नाही हे देखील तपासणे आवश्यक आहे. कारण, शिक्षणाच्या नावाखाली अनेक संस्था व्यवसाय करतात. त्यामुळे तुमच्या बजेटपेक्षा महागडी प्री-स्कूल निवडण्याची चूक करू नका कारण त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाचे पुढील शिक्षणही पूर्ण करायचे आहे, हे लक्षात असू द्या.
घरापासून जवळ असलेले प्री स्कूल
मुलांच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही त्यांना घराजवळच्या प्री-स्कूलमध्येच पाठवावे. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि मुल प्रवासाने थकणार देखील नाही. शक्यतो पायी चालत जाता येईल अशा अंतरावरीलच प्री स्कूलची निवड करा. जेणेकरून काही आपतकालिन परिस्थिती ओढवली तर तिथे पटकन पोहोचता येऊ शकते.
प्री स्कूलमधील स्टाफ
काही मुलं स्वभावाने हट्टी आणि चीडखोर असतात, अशावेळी शाळेचा त्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तपासून पहा. शाळेचे कर्मचारी अशा मुलांना कसे हाताळतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.