मुंबई: आजकाल आपण ऑनलाईन खूप काही वस्तू मागवत असतो. पण, मुंबईतील एका तरुणाला ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईसक्रिम कोनमध्ये मानवी बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आपण फिंगर चिप्स ऐकलंय पण फिंगर आईसक्रिम हा प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल.
'फ्री प्रेस जरनल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ब्रँडन सेर्राओ (वय २७) याने बुधवारी झेपटो अॅपवरुन आईसक्रिम कोन ऑनलाईन मागवलं होतं. पण, जेव्हा त्याला आईस्क्रिम मिळालं तेव्हा त्याला धक्काच बसला. ब्रँडनने बटरस्कॉच आईसक्रिम वरील कव्हर काढलं आणि तो आईसक्रिम खाण्याचा आनंद घेऊ लागला. इतक्यात त्याच्या जिभेला काहीतरी कठीण लागलं. त्यामुळे त्याने तो कठीण भाग बाहेर ओढला तर त्याला दोन सेंटिमीटर लांब मानवाचे एक बोट आढळून आले. ब्रँडन स्वत: डॉक्टर असल्याने बोट मानसाचेच असल्याचं त्याला लगेच लक्षात आलं.
FPJने दिलेल्या रिपोर्टनुसार, बुधवारी सकाळी ब्रँडनने झेपटो अॅपवरून काही सामान मागवले होते. त्यावेळी तिच्या बहिणीने त्याला बटरस्कॉच आईसक्रिम देखील ऑर्डर करण्यास सांगितलं. जेव्हा आईसक्रिमची ऑर्डर मिळाली आणि त्याने ते खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला धक्काच बसला.मिळालेल्या माहितीनुसार, ब्रँडनने याप्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, 'बोट ताब्यात घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात येईल. ज्या ठिकाणी आईसक्रिम तयार झाले आणि ज्या ठिकाणी पॅकेजिंग झाले त्या ठिकाणाचा शोध घेण्यात येईल. आम्ही हा विषय गांभीर्याने घेतला आहे.' दरम्यान, याप्रकरणी आईसक्रिम उत्पादक कंपनीशी संपर्क होऊ शकलेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.