कर्नाटकचे माजी मुख्यमंत्र्यावर अटकेची टागंती तलवार, अल्पवयीन मुलीवर लैंगिकआत्याच्यार केल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर अटकेटची टांगती तलवार आहे. त्यामागील कारणही अगदी तितकच मोठं आणि फार संवेदनशील आहे. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
येडियुरप्पा यांनी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने हा आरोप केला आहे. पीडितेच्या आईने पोलिसात या प्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत येडियुरप्पा यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कर्नाटकचं सीआयडीचं पथक तपास करत आहेत. येडियुरप्पा यांना याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण ते हजर राहिले नाहीत. यामुळे बंगळुरुच्या फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. या वॉरंटनंतर आता येडियुरप्पा यांना पोलिसांकडून कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी गेल्या महिन्यात आरोप केले होते. ही महिला 54 वर्षांची होती. तिचं गेल्या महिन्यात एका खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झालं, अशी माहिती समोर येत आहे. याच महिलेने आपल्या लेकीवर येडियुरप्पा यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी येडियुरप्पा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. पण येडियुरप्पा चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी फास्ट्रट्रॅक कोर्टात येडियुरप्पा यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे.
येडियुरप्पा यांची हायकोर्टात धाव
दुसरकीडे बी. एस. येडियुरप्पा यांनी संबंधित प्रकरणात आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत, असा दावा केला आहे. तसेच या प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी येडियुरप्पा यांना काल (12 जून) नोटीस बजावली होती आणि त्यांना तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर बीएस येडियुरप्पा यांनी हा खटला रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात धाव घेतली. सुनावणीला उपस्थित राहण्याच्या नोटीसला उत्तर देताना येडियुरप्पा यांनी 17 जूनला होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहू, असं सांगितलं आहे.
पीडितेच्या भावाची येडियुरप्पा यांना अटक करण्याची मागणी
या प्रकरणी पीडितेच्या भावाने काल हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून त्याने माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अटक करण्याची मागणी केली होती. संबंधित घटनेला अनेक महिने झाल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. येडियुरप्पा यांना अटक करुन अद्याप चौकशी झालेली नाही. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलेले नाहीत, अशी तक्रार पीडितेच्या भावाने याचिकेत केली. तसेच कोर्टाने येडियुरप्पा यांच्या अटकेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी पीडितेच्या भावाने याचिकेत केली आहे.संबंधित प्रकरणावरुन वातावरण तापल्यानंतर आता कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वेळ पडली तर सीआयडी माजी मुख्यमत्री येडियुरप्पा यांना अटक करेल. त्यांना नोटीसला उत्तर द्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.