राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयात गुन्हेगारांचा वावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींनी मंत्री खाडे यांच्या मुलाची भेट घेत विचारपूस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.
सुरेश खाडे यांच्या कार्यालयाला भेट देणारा व्यक्ती हा मिरज शहराला हादरून टाकणाऱ्या सलीम भिलवडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सोहेल नदाफ असं त्याचं नाव आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आला असून त्याच्या टोळीकडून मिरज शहरात सध्या दहशत निर्माण करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर त्याने मंत्री पुत्र सुशांत खाडे याची थेट त्यांच्याच संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने मिरज शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. मिरज शहरातले कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.पुण्यापाठोपाठ मिरज शहरात कोयता गँगची मोठी दहशत निर्माण झाली आहे.दोनवेळा कोयता गँगच्या गुंडांनी मिरज शहरातील सुमारे 35 ते 40 वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर खून, मारामाऱ्या, अशा घटना वारंवार घडत आहे.
गुन्हेगार तसेच गावगुंडांना कायद्याचा धाक उरला नाही का? असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच पालकमंत्री असणाऱ्या सुरेश खाडे यांच्याच कार्यालयामध्ये गुंडांचा वावर वाढला आहेत. खाडे यांच्या मुलासोबत आरोपींनी घेतलेल्या भेटीगाठीमुळे पालकमंत्र्यांचे गुन्हेगारांना अभय तर नाही ना? अशा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.