Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनोरमा खेडकरला अखेर अटक, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पोलीस होते शोधात

मनोरमा खेडकरला अखेर अटक, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पोलीस होते शोधात

पुणे- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अखेर अटक करण्यात आली आहे. पौंड पोलिसांनी मनोरमाला रायगडमधून अटक केल्याची माहिती मिळत आहेत. बंदूक रोखून एका शेतकऱ्याला धमकवल्याचा आरोप मनोरमावर होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मनोरमा फरार होती.

आयएएस पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर मुळशीमध्ये एका शेतकऱ्याला धमकावत असल्याचं दिसलं होतं. यावेळी तिच्या हातात बंदूक दिसत होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शेतकऱ्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी मनोरमा आणि पती दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या दोघांच्या शोधात होते.

मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी आपला मोबाईल फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. महाडच्या हिरकणवाडी भागात पार्वती हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसली होती. मनोरमाचे पती दिलीप खेडकर हे अद्याप फरार आहेत. शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी दोन बाऊन्सर, दोन महिलांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मनोरमा खेडकरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. यात ती पोलिसांची हुज्जत घालत असताना दिसली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस मनोरमाच्या बाणेर येथील बंगल्यामध्ये पोहोचले होते. पण, मनोरमाने पोलिसांना बंगल्यामध्ये प्रवेश करू दिला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा फरार होती. पोलिसांनी तिला अटक केली असून तिला पुण्यामध्ये आणले जात आहे. आज तिला कोर्टामध्ये हजर केले जाईल.

दरम्यान, प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर ही अडचणीत सापडली आहे. तिच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. खेडकरचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणण्यात आला असून तिला मसुरी येथे बोलावण्यात आले आहे. अद्याप पूजा मसुरी येथे गेली नाही. पूजाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी तिला पुण्यात लेखी जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.