Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक  दिलीप पाटील यांचे निधन 


कोल्हापूर :मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक व मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप मधुकर पाटील (वय 60) यांचे शनिवारी निधन झाले. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

दिलीप पाटील हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने आजारी होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले. उपचारानंतर ते कोल्हापुरात आले होते. पुन्हा त्रास सुरू झाल्यामुळे शनिवारी सकाळी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु तब्येत खालावल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. पुढील उपचारासाठी पुण्याला नेत असताना कराडजवळ वाटेतच त्यांचे निधन झाले. दिलीप पाटील यांचा कोपर्डी प्रकरणापासून मराठा आरक्षण आंदोलनात हिरिरीने सहभाग होता. मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यूएससंदर्भात त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढाई दिली. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते याचिकाकर्ते होते.

मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यापासून ते 'सारथी' संस्था व अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधातदेखील त्यांनी न्यायालयीन लढाई दिली होती. दोन वर्षांपूर्वी सीमाभागात शिनोळी येथे काढलेल्या मोर्चावेळी दिलीप पाटील हे गनिमीकाव्याने बेळगावात दाखल झाले होते. ते कोल्हापुरील फौंड्री उद्योजक,. पॉप्युलर स्पोर्टस् क्लबचे माजी क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी क्षत्रिय मराठा संघटना स्थापन करून मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यांच्या निधनाने मराठा समाज आरक्षण चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.