Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'गाडीमध्ये बसवलं आणि 12 तास...', मेडिकल विद्यार्थिनीसोबत डॉक्टरचं घृणास्पद कृत्य

'गाडीमध्ये बसवलं आणि 12 तास...', मेडिकल विद्यार्थिनीसोबत डॉक्टरचं घृणास्पद कृत्य
 

पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथल्या आर. जी. कर हॉस्पिटलमधल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तिथे 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयातल्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता.

खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता. या घटनेतून देश सावरत नाही, तोच हरियाणातदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. पीजीआय रोहतकमधल्या मेडिकल विद्यार्थिनीने आपल्या वरिष्ठ डॉक्टरवर लैंगिक शोषण आणि अपहरणाचा आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर वरिष्ठ डॉक्टरच्या घृणास्पद कृत्याबाबत सांगितलं आहे.

या तरुणीने इन्स्टाग्रामवर सांगितलं, की ती पीजीआय रोहतक इथे बीडीएस शाखेतली प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. पीजी अ‍ॅनाटॉमी विभागातले डॉ. मनिंदर कौशिक गेल्या सात महिन्यांपासून तिचा पाठलाग करत आहे. सुरुवातीला त्याने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्याने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यावर तो हिंसक झाला.

ती म्हणाली, "गेल्या दोन महिन्यांपासून तो सतत मला त्रास देत असून ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे मी दडपणाखाली जगत आहे. मी त्याचं म्हणणं ऐकलं नाही, तर मी अ‍ॅनाटॉमी विषयात नापास होईन, अशी धमकी त्याने मला दिली आहे. त्यानं माझं परिक्षेचं अ‍ॅडमिट कार्डही रोखून धरलं होते. मला हतबल करण्यासाठी त्याने या कार्डचा वापर केला."

पीडितेने सांगितलं, की वरिष्ठ डॉक्टरने 16 ऑगस्ट रोजी तिला फोन करून लायब्ररीबाहेर बोलावलं. त्याने अ‍ॅडमिट कार्ड देण्याचं आश्वासन दिलं. ती जेव्हा त्याला भेटण्यासाठी गेली तेव्हा तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं. तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि अज्ञात स्थळी नेलं. 16 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 12 तास त्याने पीडितेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर मनिंदरने तिच्यावर चाकूने वार केले. तिला लाथा-बुक्क्यांचा मार दिला. तिच्या संपूर्ण शरीरावर याच्या खुणा दिसत होत्या. आपला हेतू साध्य केल्यानंतर त्याने तिला कॅम्पसमध्ये सोडलं. त्यानंतर पीडितेने ताबडतोब आपल्या पालकांना बोलावून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अजूनही आरोपीवर ठोस कारवाई झालेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.