नाशिक : लग्नासाठी दबाव टाकून वारंवार धमकावणाऱ्या युवकासह इतरांच्या छळाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने विष सेवन करून जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार देवळाली गावात उघडकीस आला. या प्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिस ठाण्यात मुलीस त्रास देणाऱ्या युवकासह १० जणांविरोधात मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक रोड येथील मालधक्का रोडवरील १५ वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि. २३) विष सेवन करून आत्महत्या केली. तिने शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास देवळाली गाव स्मशानभूमीजवळ विष सेवन केल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान, तिचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीस नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कलाम इजहार मन्सुरी (२२, रा. गुलाबवाडी) हा जानेवारी २०२२ पासून तिचा वारंवार पाठलाग करत होता. मुलीच्या शाळेसह ती जात असलेल्या महाविद्यालयातही तो पाठलाग करीत तिला छळायचा. 'तू मला खूप आवडते तू माझ्याशी लग्न कर, मी तुझं लग्न कुठेही होऊ देणार नाही' असा नेहमी दम द्यायचा. तसेच संशयित कलामची आई नाना खाला हीदेखील मुलीला धमकावत कलामला सांगून तुला पळवून आणेन असे सांगायची.
संशयित जहांगीर शेख, बबलू शेख व मुन्ना शेख हेदेखील, 'तू जर कलाम मन्सुरीबरोबर लग्न केले नाही, तर आम्ही तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही' अशी धमकी देत होते. संशयित लादेन मन्सुरी, समीर बबलू शेख, नंदा मन्सुरी हेदेखील त्या मुलीला, तुला कलामबरोबरच लग्न करावे लागेल नाही तर तुझे कोठेच लग्न होऊ देणार नाही असे बोलत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधातही मृत मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात कलामसह १० जणांविरोधात अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी, पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चक्कर येऊन पडल्याची दिली माहिती
संशयितांच्या छळाला कंटाळून मुलीने शुक्रवारी दुपारी विष सेवन केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. तसेच मुलीने विष सेवन केलेले असतानाही संशयित अंजुम सय्यद व साहिल सय्यद यांनी फोन करून तुमची मुलगी विहितगाव पुलावर चक्कर येऊन पडली अशी खोटी माहिती दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.