4 महिन्यांपूर्वी लग्न, MBBS डॉक्टर तरुणीने घेतला गळफास; 3 पानी पत्रात लिहिलं कारण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीने गळफास घेतलाय. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या विवाहितेचे नाव आहे. पती हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता शिवाय माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचर साठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या या डॉक्टर पत्नीने आपलं आयुष्य संपवलं
पतीला फोन करून प्रतीक्षाने घरी बोलावले मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतीक्षा मूळची कन्नड तालुक्यातली होती. एमबीबीएस झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम गवारे याच्याशी मार्च महिन्यातच विवाह झाला. पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्याने प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रीतम तिच्यावर संशय घेत होता. वडिलांकडून पैसे आण, घरासाठी, फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता.
महिन्याभरापूर्वीच प्रतीक्षाला एमजीएममध्ये नोकरी लागली होती. ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. १ सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती. दरम्यान, त्याआधीच तिने टोकाचं पाऊल उचललं. शनिवारी दुपारी एक वाजता प्रतीक्षा रुग्णालयातून घरी परतली. तेव्हा तिने पतीला मेसेज करून घरी बोलावलं. मात्र पती येण्याआधीच तिने गळफास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, प्रतीक्षाने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह पती प्रीतमने एमजीएममध्ये पोहोचवला. त्यानंतर तो पसार झाला.बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम हे १ ऑगस्टपासून घर भाडेतत्त्वावर घेऊन राहत होते. प्रतीक्षाचं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तर प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेतो. त्याचं कन्नड परिसरात एक सुपर शॉपीही आहे. प्रीतम प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सतत कॉल करून विचारणा करत असे. कॉल रिसिव्ह केला नाही तर सतत कॉल करून त्रास द्यायचा. प्रतीक्षाने तीन पानी सुसाइड नोटही लिहिली आहे. पोलिसांनी सदर चिठ्ठी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.