जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०) यांना मिळालेली ३० लाखांची रक्कम लाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कारमध्ये त्यांची हत्या केली.
स्नेहलता चुंबळे एप्रिल २०२३ मध्ये साळवा नांदेड (ता. धरणगाव) येथून निवृत्त झाल्या होत्या. १७ ला स्नेहलता मुलगा समीर याच्यासह नाशिकहून जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्टला रात्री अकराच्या रेल्वेने त्या नाशिकला परत येणार असल्याचे पती संजय देशमुख यांना फोन करून सांगितले होते. मात्र, त्या पोहोचल्याच नाही.मुलगा समीर, पती संजय यांनी २१ ऑगस्टला त्यांचा शोध घेतला. मात्र, माहिती मिळाली नाही. स्नेहलता यांनी नाशिकला प्लॉट घेण्यासाठी स्टेट बँकेतून ३० लाख रुपये काढले. त्यांच्यासोबत काम करणारा जिजाबराव पाटील असल्याची माहिती स्नेहलता यांची मुलगी मयुरी देशमुख हिला चांदसर येथील मामा सुनील शिंदे यांनी दिली. ही माहिती कुटुंबीयांनी दिल्याने गुन्हे शाखेने तपासाला गती दिली.
गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील व कर्मचाऱ्यांनी जिजाबराव पाटील (वय ४८, रा. मुंदडानगर, अमळनेर) व विजय रंगराव निकम (वय ४६) यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता, सुरवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना रात्री अकराला अटक करण्यात आली. मृत स्नेहलता यांचा मुलगा समीर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गळा आवळून खून
स्नेहलता चुंबळे जळगावला ग. स.सोसायटीच्या बैठकीला आल्या असताना, जिजाबराव पाटील व विजय निकम यांची भेट झाली. प्लॉट घेण्यासाठी पैसे काढायचे असल्याचे सांगितल्याने जिजाबराव त्यांच्यासोबत गेला. पैसे काढून स्नेहलता यांना कारमध्ये घेऊन जात असताना, गळा आवळून खून करून मृतदेहाची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली.
संशयित संघटनेचे पदाधिकारी
जिजाबराव पाटील व विजय निकम जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. दोघांव्यतिरिक्त या गुन्ह्यात इतरही सहभागी आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.