Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज असताना...'

'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज असताना...'
 

नागपूरच्या सीताबर्डी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या भरधाव ऑडी कारच्या अपघातावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ऑडी कारनं  दोन कार आणि एका बाईकला उडवलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही गाडी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत यांच्या नावावर नोंदणी केलेली आहे. त्यामुळेच या प्रकरणावरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सर्व सामान्यांना एक कायदा आणि बड्या बापाच्या मुलांना एक कायदा असं आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

चालकाची आदलाबदली का केली?

"बावनकुळेंचा मुलगा असो किंवा इतर कोणत्याही नेत्याचा मुलगा असो, या राज्यामध्ये दोन कायदे आहेत का? महाराष्ट्रात हिट अँड रनची प्रकरणं एवढी वाढली आहेत की मोठ्या बापाची पोरं मद्यपान करुन रस्त्यावर कोणालाही चिरडतात, उडवतात, जखमी करतात. मोठ्या बापाच्या पोरांची नावही एफआयआरमध्ये नसतात. फडणवीस गृहमंत्री आहेत आणि राज्यात एकच कायदा आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे की नागपूरमध्ये हिट अँड रनचं जे प्रकरण घडलं त्यामधील कार कोणाची आहे? गाडी कोण चालवत होतं? चालकाची आदलाबदली का केली? हे सर्व रेकॉर्डवर आहे. आरटीओ अधिकाऱ्याने नंबरप्लेट का बदलली?" असा प्रश्न राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.

दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत साधं एफआयआरमध्ये नाव नाही?

"बावनकुळेंचा त्यांच्या कुटुंबाचा या अपघाताशी काही संबंध नाही तर ही चोरी कशासाठी? ही चोरी केली कारण जो शहजादा गाडी चालवत होता तो नशेत धुंद होता. त्याला वाचवण्यात आलं आहे. हे सारं प्रकरण समोर आल्यानंतर कायदा सुव्यवस्था किती उद्धवस्त झाली आहे हे दिसतं. फडणवीस ज्या शहरातून येतात त्या शहराची अवस्था बघा. इतर कोणत्या पक्षातील नेत्याचा हा मुलगा असता तर आतापर्यंत फडणवीसांची फौज आमच्यावर किती हल्ले केले असते. मात्र आज तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे. नशेत धुंद होता, असं रेकॉर्डवर आहे. तो गाडी चालवत होता. दोघे मृत्यूशी झुंज देत असताना साधं एफआयआरमध्ये नावही नाही," असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय

"गाडी बावनकुळेंच्या मुलाची आहे. तो गाडी चलवत होता. सर्व पुरावे नष्ट केलं. असं करत असाल तर कायद्याचं नाव घेऊन विरोधकांना त्रास देण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? नाहीये. फडणवीस तुम्ही त्या पदावर बसण्यास लायक नाहीत. निष्पक्ष चौकशी हे काय करणार? जोपर्यंत फडणवीस या पदावर आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष तपासणी होणार नाही. जोपर्यंत रश्मी शुक्ला डीजी आहेत तो निष्पक्ष तपासणी होणार नाही. कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय. कायद्याला नाचवलं जात आहे. विकत घेतलं जात आहे. लोकांना चिरडून मारलं जात आहे. साधं एफआयआरमध्ये नावही नाही, लाहोरी रेस्तराँ बार आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज काढा. कोण दारु पीत होतं. कोण दारुच्या नशेत गाडी चालवत होतं एकदा तपासून पाहा. त्याची सीसीटीव्ही फुटेज सापडणार नाहीत," असं राऊत म्हणाले. 

फडणवीस लायक नाहीत

"विषय चंद्रशेखर बावनकुळेंचा नाही. हा विषय या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा कचरा झाल्याचा आहे. मोदी कायदा सगळ्यांसाठी सारखा असं म्हणत समान नागरी कायदा असं म्हणतात ना? गाडी कोण चालवत होतं? अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवलं आणि त्याचं नाव घेतलं. हा या राज्यातला कायदा आहे? मी सर्वांशी समान न्यायाने वागेन म्हणून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. सर्वासामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या मुलाबाळांना एक न्याय. आमच्यावर गुन्हे दाखल करणार, अटक करणार आणि तुम्ही लोकांना चिरडून मोकाट फिरणार? फडणवीसांसारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही," अशी टीका राऊत यांनी केली.

घडलं काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, संकेतने कार चालक अर्जुन हावरे (24) आणि रोनित चिंतमवार (27) यांना चालवायला दिली होती. याच कारने रविवारी मध्यरात्री 5 वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के (40) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी kकार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची 'नंबर प्लेट' काढण्यात आल्याचे उघड झाले. कार कुणाच्या नावावर आहे, याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागविल्याचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले होते. संविधान चौकापासून ते सेंट्रल बाजार रोडवरील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याची चर्चा शहरामध्ये आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.