''जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका बदलली..'' राहुल गांधींनी सांगितला पुढला प्लॅन
सांगलीः छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पण ती त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल समस्त महाराष्ट्र आणि देशवासियांची माफीही मागितली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुला गांधी यांनी केली. कडेगाव (जि.सांगली) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करीत गांधी यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले,'' मोदी यांनी संघाच्या माणसाला शिवपुतळ्याचे कंत्राट दिले. ते गुणवत्तेवर नव्हे तर ओळखीने दिले आहे. तेच ते प्रशासनात करीत आहेत. तुम्ही संघाचे असाल तर तुम्हाला नोकरी. नसाल तर तुम्हाला संधी नाही. काही महिन्यांपूर्वी जात गणना करण्याची गरजच काय असे म्हणणारा संघ आता ती व्हायला हरकत नाही असे म्हणतो आहे.
आम्ही लोकसभेत ही जनगणना करु असे ठामपणे सांगितले होते. त्यातून आम्ही या देशात कोणाच्या हाती किती साधनसंपत्ती आहे याचा एक्स रे काढणार आहोत. याला विरोध करण्यासारखे काय आहे? आम्ही शेवटच्या माणसांच्या हाती सत्ता देणार आहोत. त्याची ही सुरुवात आहे.'' असं राहुल गांधी म्हणाले.ते म्हणाले,'''केंद्र सरकार नरेंद्र मोदी-अमित शहा या दोन माणसांचे आहे आणि ते फक्त दोन माणसांचाच विचार करते. ती दोन माणसे म्हणजे अदाणी-अंबानी आहेत. त्यांच्यासारख्या केवळ २२ उद्योजकांना या सरकारने १६ लाख कोटी माफ केले. आमच्या युपीए सरकारने उद्योगपतींचे नव्हे तर शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी कर्ज माफ केले होते. यांनी बँकांचे दरवाजे केवळ अब्जाधीशांसाठी उघडले. आम्ही ते गरीबांकाठी उघडणार आहोत. त्यांचे सोळा लाख कोटी माफ होतात तर आमच्या शेतकऱ्यांचेही माफ झाले पाहिजेत.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही केवळ न्यायाची भाषा करीत आहोत. हीच लढाई महाराष्ट्रात आहे. इथल्या पायाभूत सुविधांमधील भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. रस्ते, पूलामधील भ्रष्टाचार बाहेरचे लोक येऊन करीत आहेत. आम्ही हे चित्र बदलणार आहोत. इथे महाराष्ट्रात जनतेचे, बेरोजगारांचे शेतकऱ्यांचे सरकार येऊ घातले आहे. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जिथे बोलवाल तिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी येणार आहे.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.