तिरुपतीचा प्राण्यांची चरबीयुक्त प्रसाद ग्रहण केलेल्या भाविकांना प्रायश्चित्त घेता येणार !
वाराणसी (उत्तरप्रदेश) - तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडवांच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हा प्रसाद ज्या भाविकांनी सेवन केला, त्यांना चिंता वाटू लागली आहे. या संदर्भात काशी विद़्वत कर्मकांड परिषदेने भाविकांना अभक्ष्य (जे पदार्थ
ग्रहण करणे अनुचित आहेत) प्रसाद ग्रहण केल्याने प्रायश्चित्त करण्यास
सांगितले आहे. काशी विद़्वत कर्मकांड परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि
श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष आचार्य अशोक द्विवेदी
म्हणाले की, ज्यांच्या मनात अपराधी भावना आहे, त्यांनी अभक्ष्य प्रसाद
खाऊन केलेल्या पापाचे प्रायश्चित्त करावे. काशी विद़्वत कर्मकांड परिषद
भक्तांना प्रायश्चित्त घेण्यासाठी साहाय्य करेल.
प्रायश्चित्ताचा मूळ देव नारायण आहे. तिरुपती हा नारायण आहे. भगवान विष्णु किंवा शाळिग्राम यांची प्रतिष्ठापना केल्याने सर्वांचे प्रायश्चित्त विधी पूर्ण होतील. ज्यांनी प्रसाद ग्रहण केला असेल, त्यांनी पंचगव्य प्राशन करावे. यासाठी गायत्री मंत्राने गोमूत्र, गंधकासह इति मंत्राने गोमय, अप्ययश्वसमेति मंत्रासह गायीचे दूध, दधिकाग्रे मंत्रासह गायीची दधी, इजोसी मंत्रासह गोघृत, देवस्यत्व मंत्रासह गंगाजल किंवा कोणत्याही प्रादेशिक नदीचे पाणी घेऊन ते अभिमंत्रित करावे. यानंतर 'यत्वागस्तिगतम् पाप…' या श्लोकानंतर १२ वेळा ओम म्हणत पंचगव्य प्राशन करावे. विद़्वत परिषद लवकरच प्रायश्चित्त हवनासाठी पत्र प्रसारित करेल.
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, अनेक हिंदू आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्या काळात आपणही तिरुपतीचे लाडू खाल्ले, हे जाणून 'आपण भ्रष्ट झालो आहोत का? जर 'होय' तर यावर प्रायश्चित्त काय ?', असे प्रश्न विचारले जात आहेत. भावनांच्या शुद्धीकरणासाठी आम्ही धर्मशास्त्रज्ञांशी विचारविनिमय करून शास्त्रानुसार प्रायश्चित्त घोषित करू.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.