हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून, १५ लाखांच्या चांदीसह दागिने लंपास; संशयित भाऊ ताब्यात
हुपरी : येथील तरुण चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१ रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. यावेळी हल्लेखोरांनी कपाटातील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी व चांदीचे दागिनेही लंपास केले.
याप्रकरणी भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला संशयित म्हणून हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून हुपरी व गोकुळ शिरगाव पोलिस या खुनाचा तपास करीत आहेत. महिन्याच्या कालावधीत दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली माहिती अशी. चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ हालुंडे हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्व्हर झोन वसाहतीमध्ये आई- वडिलांसह वास्तव्यास होते. परपेठेतील सराफांच्या मागणीनुसार चांदी दागिने बनवून घेऊन पोहोच करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. ते अविवाहित असून धार्मिकवृतीचे होते. आई-वडिलांसह ते एकत्रित राहात असले तरीही त्यांचा चांदी व्यवसाय स्वतंत्र होता. त्यांचे मुळगाव जैनवाडी (ता. निपाणी) असून त्यांच्या शेतातील भुईमूग काढणी सध्या सुरू आहे. त्यामुळे आई-वडील शनिवारपासून तिकडे गेल्याने दोन दिवसांपासून ते घरी एकटेच होते.
आई-वडील परतल्यावर खून उघडकीस
मुनीश्री आर्षकीर्तीजी महाराज यांचा ४५ वा वर्षवर्धन हा धार्मिक सोहळा रविवारी यळगूड (ता. हातकणंगले) येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ब्रह्मनाथ हालुंडे हे सकाळी १० पासून सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी जेवण करून ते घरी परतले होते. दरम्यानच्या कालावधीत त्यांचा खून झाला. त्यांचे आई-वडील सायंकाळी साडेसहा वाजता जैनवाडी येथून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.