'हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा या कलाकाराला थेट इशारा
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील अतिशय आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या परखड मतांना महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात नेहमीच महत्त्व दिले गेले आहे.
महाराष्ट्राच्या फायद्याच्या योजनांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. अनेकदा ते मराठी तसेच इतर भाषिक कलाकारांच्या भेटी घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. मात्र नुकतंच एका कलाकाराचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत याबाबत सांगितले आहे. हा कलाकार आहे फवाद खान. फवादचा आगामी पाकिस्तानी चित्रपट 'लीजेंड ऑफ मौला जट' लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. मात्र राज ठाकरे यांनी यासाठी आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. असे न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय,"फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लीजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरू आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे. राज ठाकरे." दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार आणि थिएटर मालक यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.