३ वर्ष प्रेम अन् अखेरची भेट; युवतीला भेटायला बोलावले त्यानंतर संबंध ठेवण्याचा हट्ट, लव्ह स्टोरीचा दुर्दैवी अंत
तारीख २९ ऑगस्ट २०२४, वेळ सकाळी ११ वाजता, स्थळ- उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील गोसाईगंज पोलीस ठाणे...दरदिवशी सारखंच पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामात व्यस्त होते तेव्हा अचानक एक महिला दयनीय अवस्थेत तिथे पोहचते.
या महिलेचं छोटं मोठं भांडण झालं असावं असं पोलिसांना वाटतं परंतु जसं ती पोलिसांना खरं कारण सांगते, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते. ही महिला रडत रडत सांगते, तिच्याकडे एकाचा कॉल आला आणि फोन करणाऱ्याने तुमच्या मुलीचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ पडल्याचे सांगितले.महिलेचं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांचे एक पथक तिने सांगितलेली घटनास्थळी पोहचते. ज्या ठिकाणाचा उल्लेख महिलेने केला ते पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच आहे. पोलिसांची टीम तिथे जाते, तेव्हा खूप दुर्गंध येत असतो. तोंडावर रुमाल लावून पोलीस निर्जनस्थळी पोहचताच तेव्हा तिथे एका मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडतो. वरिष्ठ अधिकारी तिथे पोहचतात. त्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमोर्टमला पाठवतात. जी महिला पोलीस स्टेशनला आली तिने कपड्यावरून ती माझी मुलगी सविता असल्याचं सांगते.
सविताच्या नंबरवरूनच आईला कॉल
पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये सविताचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं समोर आले. हत्येनंतर घटनास्थळी आरोपीनं एकही सुगावा ठेवला नाही. ज्या नंबरने मृत मुलीच्या आईला कॉल आला तो नंबर सविताचा होता. परंतु तो आता स्विच ऑफ झाला होता. पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही शोधतात परंतु त्यातही काही निष्पन्न होत नाही. त्यानंतर पोलीस सविताचा कॉल डिटेल्स तपासतात त्यात असा नंबर मिळतो ज्यावर मोबाईल बंद होण्यापूर्वी अखेरचा कॉल करण्यात आला होता.
लव्हस्टोरीचा दुर्दैवी अंत
हा नंबर दीपक नावाच्या व्यक्तीचा असतो, पोलीस त्या नंबरवर कॉल करतात त्याला सविताबद्दल विचारतात. मात्र सविता नावाच्या कुठल्या मुलीला मी ओळखत नसल्याचं तो पोलिसांना सांगतो. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावतो. पोलीस दीपकचा नंबर ट्रेस करून त्याला अटक करतात. दीपक पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतो. त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच तो पोलिसांसमोर सत्य उघड करतो. सविता आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यानेच सविताचा गळा दाबून खून केला. जेव्हा अनेक दिवसांपासून सविताच्या मृतदेहाबाबत कुणालाही कळले नाही तेव्हा त्यानेच प्रेयसीच्या मोबाईलवरून तिच्या आईला घटनास्थळाविषयी सांगितले.
लग्न झाल्याचं सवितापासून लपवलं होतं...
सविता आणि दीपकची ओळख ३ वर्षापूर्वी झाली होती. दोघेही एकमेकांना आवडू लागले. त्यानंतर हळूहळू दोघं लपून छपून भेटू लागले. त्यात दीपकचं लग्न झालं परंतु ही गोष्ट त्याने सवितापासून लपवून ठेवली. मात्र जास्त दिवस हे लपवता आले नाही. सविताला दीपकच्या लग्नाबद्दल माहिती झाले. त्यानंतर सविताने दीपकशी बोलणं सोडले. सविता तिच्या अन्य मित्राशी मोबाईलवरून बोलते असं दीपकला माहिती पडले. त्यामुळे रागाच्या भरात दीपकनं सविताला फोन केला. परंतु सविताने मला तुझ्याशी कुठलेही नाते ठेवायचे नाही असं सांगत फोन ठेवला.
संबंध ठेवण्याचा हट्ट
२० ऑगस्टला दीपकनं सविताला फोन करून अखेरचं भेटण्यास बोलावले. पुढच्या दिवशी सविता काहीतरी काम सांगून घराबाहेर पडली. बोलण्याच्या बहाण्याने दीपकने सविताला रेल्वे स्टेशनजवळील निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर संबंध बनवण्याचा हट्ट धरला. तेव्हा सविताने त्यास नकार दिला. याचाच राग येऊन दीपकनं सविताचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर दीपकने तिचा मोबाईल स्वत:जवळ ठेवला आणि अनेक दिवस तिच्या मोबाईलवर कुणाकुणाचे कॉल येतायेत हे चेक केले.दरम्यान, सविताच्या नातेवाईकांनी जेव्हा २ दिवस तिचा ठावठिकाणा लागला नाही तेव्हा सविताचा शोध सुरू केला. २९ ऑगस्टला दीपकनं सविताच्या मोबाईलवरून तिच्या आईला कॉल केला आणि तिचा मृतदेह असलेले ठिकाण सांगितले. त्याआधी दीपक मृतदेह पाहण्यासाठी तिथे गेला होता. दीपककडून पोलिसांनी २ मोबाईल जप्त केलेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दीपकला अटक करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.