बँकेतली नोकरी सोडली अन् 26 व्या वर्षी बनली महाराष्ट्रातील पहिली महिला ST चालक, कोण आहे ही तरुणी?
पुणे :- आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळतात तर लालपरी'च्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक म्हणून एका तरुणीने बसचे स्टेअरिंग हाती घेतले आहे. शीतल शिंदे असे या तरुणीचे नाव आहे. तिने पहिली महिला एसटी बसचालक होण्याचा
मान मिळवला आहे. तिचा आतापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा झाला, याचबाबत हा
विशेष आढावा.
शीतल ही पुण्याची असून महाराष्ट्रातील पहिली महिला एसटी चालक आहे. ती एक
उच्च शिक्षित तरुणी असून बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होती. मात्र,
तिच्या मनात पायलट व्हायची इच्छा होती. पण काही कारणांमुळे ते करणे तिला
शक्य झाले नाही. म्हणून मग एसटीमध्ये एक महिला चालक म्हणून काम करत ते
स्वप्न आता तिने पूर्ण केले आहे. 2 वर्षापूर्वी पुणे विभागात 17 महिलांचे
प्रशिक्षण सुरू झाले होते. आता या महिला राज्यातील विविध डेपोमध्ये सध्या
चालक म्हणून काम करत आहेत. बँक मॅनेजरची नोकरी सोडून शीतलने हा एसटीचा
प्रवास सुरू केला.
लहानपणापासूनच लालपरीबाबत आकर्षण होते. आपल्याला लालपरी चालवायची आहे, हे स्वप्न मी पाहत होते. जेव्हा 2019 मध्ये महिला चालक म्हणून जाहिरात निघाली तेव्हा मी बँकेतील नोकरी सोडून दिली आणि महिला चालक व्हायचे ठरवले. भरतीचा अर्ज करून ती परीक्षा चांगल्या मार्काने पासदेखील झाले. हे करत असताना सुरुवातीला घरच्यांचा पाठिंबा नव्हता. मात्र, एसटी महामंडळाने एक वर्षाच ट्रेनिंग दिले होते. त्यामुळे एक आत्मविश्वास आला. मग कुटुंबीयांची परवानगी घेतली. त्यानंतर पहिला प्रवास हा सोलापूर ते नळदुर्ग हा होता. महिला चालक म्हणून सगळे कौतुकाने बघत होते. त्यामुळे तो प्रवास खरंच अविस्मरणीय असा होता, या शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.पुढे ती म्हणाली की, 194 महिलांची निवड करण्यात आली. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यात या महिलांना 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण देण्यात आले. मध्यंतरी कोविडमध्ये काही वेळ हे प्रशिक्षण थांबले होते, पण हे प्रशिक्षण आता पूर्ण होऊन अनेक महिला चालक म्हणून रुजू झाल्या असल्याचे शीतलने लोकल18 शी बोलताना सांगितले. सध्या शीतल ही सोलापूर डेपो येथे कार्यरत आहे. सोलापूर ते नळदुर्ग, पंढरपूर, धाराशिव, तुळजापूर या मार्गावर ती एसटी चालवते. गाडीत बसणाऱ्या प्रवाशांना देखील चांगलं वाटतं की, एक महिला बस चालवत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.