सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी
सदार राहुल गांधी यांनी देखील 'सांगली'साठी एक विधान परिषद देण्याचे मान्य केले आहे, असे आमदार कदम यांनी स्पष्ट केले.
सांगली : सांगली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीवरून पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी श्रीमती पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'यंदा जयश्रीताईंचाच हक्क आहे,' अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. विजय बंगल्यावर गुरुवारी (ता. १०) रात्री उशिरा बैठक झाली.
'सांगली विधानसभा निवडणुकीत एकाने लढावे आणि एकाला आगामी विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जावी,' असा तोडगा विश्वजित कदम यांनी काढला. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वच नेत्यांशी चर्चा झाली आहे. अगदी खासदार राहुल गांधी यांनी देखील 'सांगली'साठी एक विधान परिषद देण्याचे मान्य केले आहे, असे आमदार कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांना वाद टाळून एकमताने निवडणुकाला सामोरे जाण्याचे आवाहन विश्वजित व विशाल यांनी केले. त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिक मांडली.
मदनभाऊंचे काम, गेल्या निवडणुकीतील माघार, लोकसभेला उघड घेतलेली भूमिका आणि आता जयश्रीताईंसाठी एक संधीची मागणी या मुद्द्यावर भर होता, असे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याआधी विश्वजित, विशाल, श्रीमती पाटील आणि जितेश कदम यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. 'सांगली'चा ताण वेळेत मिटवा, असे प्रदेश नेत्यांचे आदेश आहेत. ती जबाबदारी पूर्णतः विश्वजित कदम यांच्यावर आहे. या बैठकीनंतर ते काय भूमिका घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे. सांगली विधानसभा मतदार संघातील दोन्ही इच्छुकांशी चर्चा सुरू आहेत. गुरुवारी जयश्रीवहिनींशी चर्चा झाली. योग्य तोडगा निघेल. मी लवकरच त्याबाबत जाहीर भूमिका मांडणार आहे.
-आमदार विश्वजित कदम
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.