Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु

महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
 

देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. यातच वंदे मेट्रोची पहिली ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली असून, वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता देशभरात धावणाऱ्या अनेक वंदे भारत ट्रेन रिकाम्या जात असून, काही ट्रेनमधील ८० टक्के जागा भरत नसल्याचे समोर येत आहे.



देशातील प्रमुख शहरांना, राज्यांना इंटरसिटीसारखे जोडण्याचे काम वंदे भारतने केले आहे. उद्योगधंदे असलेली शहरे, धार्मिक स्थळे असलेली शहरे आदी भाग या वंदे भारतद्वारे जोडण्यात येत आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, बनारस, पुणे या शहरांतून या वंदेभारत ये-जा करतात. असे असले तरी यामध्ये विमानासारखी प्रिमिअम सेवा आहे. यातच अलीकडे तेलंगण राज्याला ५ वी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. गेल्याच महिन्यात सिकंदराबादहूननागपूरला वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 

केवळ २० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत

तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनला प्रवासी मिळत नाहीत. जवळपास रिकामीच ही ट्रेन धावत आहे. ही ट्रेन सिकंदराबाद-नागपूर मार्गावर धावते. सध्या या ट्रेनमध्ये क्षमतेच्या तुलनेत केवळ २० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत. म्हणजेच ही ट्रेन ८० टक्क्यांहून अधिक रिकाम्या जागांवर धावत आहे. या ट्रेनला प्रवासी न मिळण्याचे कारण काय, याबाबत रेल्वे अधिकारी विचारात पडले आहेत. याउलट जवळच्या शहरांमध्ये धावणाऱ्या इतर वंदे भारत ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत आहेत. या ट्रेन १०० टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहेत.

एक्झिक्युटिव्ह क्लास कोचमध्ये १० पेक्षा कमी प्रवासी

काही दिवसांपूर्वी ट्रेन क्रमांक २०१०२ सिकंदराबादहून नागपूरला धावली. ही ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी १२०० हून अधिक जागा रिक्त होत्या, तर ट्रेनची एकूण क्षमता १४४० जागा आहे. तर, एकूण ८८ जागा असलेल्या दोन एक्झिक्युटिव्ह क्लास कोचमध्ये १० पेक्षा कमी प्रवाशांनी आरक्षण केले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. ही वंदे भारत ट्रेन १६ सप्टेंबरला सिकंदराबाद ते नागपूर मार्गावर सुरू झाली. महाराष्ट्रातील नागपूरला रामागुंडम, काझीपेठ आणि सिकंदराबाद या औद्योगिक केंद्रांशी जोडणे हा त्याचा उद्देश होता जेणेकरून या भागातील लोकांना, व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतील.

काही दिवसांत वंदे भारत ट्रेन बंद होणार? 

सिकंदराबाद ते नागपूर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन मोठ्या प्रमाणात रिकामी जात आहे. आता ही गाडी काही दिवस बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. आणखी काही दिवस प्रवाशांनी या ट्रेनकडे दुर्लक्ष केल्यास या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी केली जाऊ शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आताच्या घडीला ही ट्रेन २० डब्यांची असून, भविष्यात ही ट्रेन ८ डब्यांची होऊ शकते. अशा स्थितीत उपलब्ध जागांची संख्या ५०० पेक्षा जास्त कमी होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.