सांगलीत मनपा शाळेत शिक्षिकेकडून ४४ विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा, संतप्त पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
संजयनगर : पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये शिक्षिकेने ४ विद्यार्थ्यांना गुरुवारी छडीने शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी मारहाणीची तक्रार पालकांनी सांगितल्यानंतर त्यांनी शुक्रवारी शाळेत येऊन संताप व्यक्त केला. शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले घटनास्थळी आल्यानंतर त्यांना घेराव घातला. संजयनगर पोलिसही तत्काळ दाखल झाले.
शाळा नंबर २९ मधील शिक्षक निवडणूक कामानिमित्त बैठकीस गेले होते. शिक्षिका विजया शिंगाडे यांच्याकडे पाच वर्ग सोपवले होते. यावेळी विद्यार्थी दंगा करत असल्याचे पाहून इयत्ता चौथी आणि सहावीच्या वर्गातील ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षिका शिंगाडे यांनी छडीने मारहाण केली. शाळेत मार खाल्लेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी घरी पालकांना हा प्रकार सांगितला.
शुक्रवारी संतप्त पालकांनी शाळेत गर्दी करत या प्रकरणाचा जाब विचारला. महापालिका प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले तत्काळ शाळेत आले. त्यांना संतप्त पालकांनी शाळेत कोंडून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून संजयनगर पोलिसांना कळवले. निरीक्षक बयाजीराव कुरळे घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रकरणावर पडदा पडला.
सक्तीच्या रजेवर पाठवा
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी पालकांसह शहर व नागरिक विकास मंचचे संघटक डॉ. कैलास पाटील यांनी केली.
मुख्याध्यापकांना चक्कर, शिक्षकास वीजेचा धक्का
संतप्त पालकांनी जाब विचारल्यानंतर मुख्याध्यापक माळी यांना चक्कर आली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, तसेच शिक्षक राऊत हे वाॅटर फिल्टर सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना सिव्हीलमध्ये 'आयसीयू' मध्ये दाखल केले. संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे दिसून आले आहे. त्या शिक्षिकेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. - शिल्पा दरेकर, उपायुक्त
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.