आई अन् बहिणीच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची कोर्टात धाव; जगनमोहन रेड्डींचं काय बिनसलं?
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आपली आई आणि बहिणीच्या विरोधामध्ये कोर्टात धाव घेतली आहे. रेड्डींच्या घरामध्ये मागच्या काही दिवसांपासून कलह निर्माण झाला आहे. त्यांची बहीण वायएस शर्मिला यांनी दिवंगत वडील वायएस राजशेखर रेड्डी
यांच्या निर्देशांचा हवाला देत जगनमोहन रेड्डींना पत्र लिहिलं होतं.
त्यांनी पत्रामध्ये लिहिलं की, ''आपल्या वडिलांनी कमावलेली सर्व संपत्ती चारही नातवांमध्ये समान वाटप झाली पाहिजे, असं त्यांनीच सांगितलं होतं. तुम्ही त्यावेळी वडिलांना याबाबत आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या शब्दांचं पालन केलं जाईल, असं शब्द दिला होता. परंतु वडिलांच्या निधनानंतर तुम्ही ते वचन विसरला आहात.''
वायएस शर्मिला यांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं?
वायएस शर्मिला यांनी या पत्राच्या माध्यमातून ठासून सांगितलं की, साक्षी मीडिया ग्रुप, भारती सिमेंट्स आणि इतर व्यवसायांवर माझ्या मुलांचा अधिकार आहे. कारण ही संपत्ती त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात कौटुंबिक संसाधनामधून कमावली होती. ''माझा आणि माझ्या मुलांचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आहे, तुम्ही याकडे डोळेझाक करु शकत नाही.''
जगनमोहन रेड्डींचं उत्तर
जगन मोहन रेड्डी यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये शर्मिला यांना एक पत्र लिहून आपली बाजू मांडली. ज्यात त्यांनी, आपल्या वडिलांनी हयात असतानाच सर्व संपत्तीची वाटणी केली होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढी मालमत्ता कमावली होती त्याचं त्यांनी योग्य वाटप केलं होतं. त्याशिवाय मी माझ्या कष्टाने आणि सचोटीने व्यवसाय उभे केले आहेत, ते कुठल्याही कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित नाहीत.
जगन मोहन रेड्डींनी हेही सांगितल की, मागच्या दहा वर्षात वायएस शर्मिला यांना साधारण २०० कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपयाने आपली आई विजयम्मा यांच्या वतीने देण्यात आलेले होते. 'शर्मिला, मी नेहमीच मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी तयार होतो, मात्र कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य झालं नाही.' असंही जगन मोहन रेड्डी सांगतात.
आई आणि बहिणीच्या विरोधात कोर्टात धाव
या कौटुंबिक वादाने कायदेशीर वळण घेतलं आहे. कारण जगन यांनी आपली बहीण आणि आईच्या विरोधात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) मध्ये याचिका दाखल केली. हे प्रकरण सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेअर वाटपाशी संबंधित आहे.याप्रकरणत जगन आणि त्यांच्या पत्नी वायएस भारती यांनी आरोप केला की, २०१९ मध्ये सामंजस्य करारानंतर शेअर वाटपामध्ये अनियमितता झालेली आहे. जगन मोहन रेड्डींचा दावा आहे की, ही संपत्ती त्यांनी स्वतः कमावलेली असून त्यांचे वडिलांच्या संपत्तीशी तिचा काहीही संबंध नाही.तर शर्मिला आणि त्यांची आई विजयम्मा यांच्यानुसार संपत्तीचं वाटप त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार झालं नाही पाहिजे. NCLT ने या प्रकरणी पुढची सुनावणी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ठेवली आहे. दुसरीकडे तेलंगणामध्ये शर्मिला यांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. राजकीय विरोध आणि कौटुंबिक संपत्ती यामुळे दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.