अंगावर धावणाऱ्या श्वानावर झाडली गोळी; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : पर्वती परिसरात श्वान अंगावर धावल्याने त्याच्यापासून बचाव करण्यासाठी एकाने थेट श्वानावरच गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी पहाटे ही घटना घडली असून, सुदैवाने यात गोळी न लागल्याने श्वान बचावला आहे.
बचावासाठी गोळी झाडल्याचा संबंधित व्यक्तीने दावा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सत्यजित कराळे (वय ३५, रा. म्हात्रे पुलाजवळ, दत्तवाडी) यांच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानाचे मालक सिद्धार्थ कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कराळे यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. कराळे हे वकील आहेत. ते रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास रिक्षाने घरी आले होते. दत्तवाडी येथे रिक्षातून उतरून ते पायी घराकडे जात होते. त्यावेळी तक्रारदारांचा पाळीव श्वान कराळे यांच्या अंगावर धावून आला. श्वान चावेल या भिती पोटी कराळे यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून श्वानाच्या दिशेने एक गोळी झाडली. गोळी श्वानाला लागली नाही. मात्र, मोठ्याने आवाज झाल्याने तक्रारदार व इतर नागरिक बाहेर आले. त्यांना घडलेला प्रकार समजला.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी घेतली. पिस्तुलातून झाडलेल्या पुंगळीचा शोध घेतला. पिस्तुल परवान्याची तपासणी केली. त्यांच्याकडे पिस्तूल परवाना आहे. याप्रकरणात पिस्तुल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.