Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"...नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल", सुपरस्टार अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी

"...नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल", सुपरस्टार अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणखी एक धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. ट्रॅफिक कंट्रोल रुमला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचं असल्याचं सांगितलं आहे.

सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याआधीही सलमानला धमक्या मिळाल्या असून त्याच्या घरावर गोळीबारही झाला आहे.

सलमान खानला पुन्हा एकदा धमकी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या  व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला असून, लॉरेन्स बिश्नोईशी  असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे  5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामंजस्य घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.

धमकी देत कोट्यवधी रुपयांची मागणी

ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये आरोपीने दावा केला आहे की, "ही धमकी हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचे असेल, तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात कसून तपास सुरु

मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा मारेकरी शिवकुमार गौतम आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा जवळचा जिशान अख्तर यांच्या विरोधात लुक आउट सर्कुलर  जारी केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला शुभम लोणकरविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं, तो नेपाळला पळून जाण्याची शक्यता पोलिसांना आहे. प्रत्येक सीमेवर आणि विमानतळावर आरोपींची माहिती देण्यात आली असून शोध सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.