रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून; देवगड समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ
रत्नागिरी : मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिली. देवगड समुद्रात ही घटना सोमवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली. कोस्टगार्ड च्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील समुद्रात रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या होत्या. त्यामध्ये रत्नागिरी राजीवडा येथील रफिक फणसोपकर यांची बोट मच्छीमारीसाठी देवगड बंदरात गेलेली होती. मच्छीमारी करत असतानाच मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलाचे डोके कापले आणि ते डोकं बोटीवर ठेवून दिले. त्यानंतर संपूर्ण बोटीला आग लावली.या आगीमध्ये बोट मालकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आजूबाजुला असलेल्या रत्नागिरीतील काही मच्छीमार बोटीवरील लोकांनी जळणा-या बोटीवरच्या तीस ते पस्तीस लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर कोस्टगार्डला पाचारण करण्यात येऊन बोटीवरच्या इतर खलाशांचे प्राण वाचविण्यात आले. या घटनेतील मृत तांडेल हा जयगड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तांडेलचे डोके कापणा-या खलाशाचे अद्याप नाव समजू शकले नाही. या घटनेमुळे रत्नागिरीतील मच्छिमार व्यवसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.