राज्यात एमबीबीएसच्या तब्बल ६०० जागा वाढणार; अंबरनाथमध्येही आता होणार मेडिकल कॉलेज
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसह अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने सोमवारी परवानगी दिली. त्यामुळे राज्यात एमबीबीएसच्या ६०० जागा वाढणार आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली भागात पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता. त्यापैकी दोनच महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात आयोगाकडे अपील करण्यात आले. त्याची सुनावणी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात झाली. त्यानंतर सोमवारी अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी एका महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाची २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यंदा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ आणि मुंबई (जीटी-कामा रुग्णालय) येथेही महाविद्यालये सुरू करण्यात येणार होती. नवीन महाविद्यालयांच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील इतर महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडे दिला होता. वैद्यकीय आयोगाने यापूर्वीच नाशिक आणि मुंबई येथे प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी दिली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा परवानगीचे पत्र संबंधित महाविद्यालयांना पाठवले. त्या आधारावर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली व जालना येथील नियोजित महाविद्यालयांना परवानगीपत्र देणार आहे.
* वैद्यकीय आयोगाच्या निर्णयामुळे गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात पहिलेवहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.* राज्यात सध्या वैद्यकीय प्रवेशाच्या अजून दोन फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे वाढलेल्या ६०० जागा त्या फेऱ्यांमध्ये दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.* राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार उर्वरित महाविद्यालयांनाही परवानगी मिळण्याची शक्यता वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.