Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यातील 15 हजारांवर कर्मचार्‍यांचे आज, उद्या मतदान

जिल्ह्यातील 15 हजारांवर कर्मचार्‍यांचे आज, उद्या मतदान
 

कोल्हापूर : निवडणूक कर्तव्यावर नेमणूक केलेल्या जिल्ह्यातील सुमारे 15 हजारांवर कर्मचार्‍यांच्या मतदानाला शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. कर्मचार्‍यांचे दुसरे प्रशिक्षण दि. 9 व 10 रोजी आयोजित केले आहे. या दोन दिवसांत सुमारे 15 हजारांवर कर्मचारी मतदान करणार आहेत. टपाली मतदानाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. दहा मतदारसंघांत 15 हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. प्रशिक्षणादरम्यानच या कर्मचार्‍यांचे टपाली मतदान करून घेतले जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

पोलिसांचे 14 पासून मतदान 

निवडणुकीसाठी तैनात पोलिस कर्मचार्‍यांचे मतदान दि. 14 ते 16 या कालावधीत होणार आहे. याकरिता विशेष मतदान केंद्र तयार केले जाणार आहे. त्याचीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

परजिल्ह्यात 3600 टपाली मतदान
 
अन्य जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर नियुक्तीस असलेले आणि मूळचे जिल्ह्यातील मतदार असलेल्या 3600 जणांचे टपाली मतदान होणार आहे. त्याकरिता मतपत्रिका पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत निवडणूक कर्मचारी 1438, अन्य निवडणूक कर्मचारी 273 व पोलिस 1889 असे एकूण 3600 टपाली मतदानासाठीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्ह्यात टपाली मतपत्रिका पाठवण्याचे काम सुरू होते. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार शासकीय कर्मचारी व पोलिस म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार मुंबई शहरमध्ये 525 इतके आहेत. मुंबई उपनगरात 509, सांगलीत 445 तर पुणे जिल्ह्यात 303 आहेत. अकोला, वाशिम ,चंद्रपूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत प्रत्येकी एक शासकीय कर्मचारी मतदार आहे. त्यांनाही टपाली मतपत्रिका पाठविण्यात आली आहे.

होम व्होटिंग 14 पासून सुरू 

दिव्यांग आणि 85 वर्षांवरील 4 हजार 601 मतदार होम व्होटिंग करणार आहेत. त्यांची मतदान प्रक्रिया 14 ते 16 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील 85 वर्षे अथवा त्यावरील तसेच 40 टक्के किंवा त्यापेक्षा जादा अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांसाठी होम व्होटिंगचा पर्याय आहे. पात्र ठरणार्‍या 65 हजार 472 मतदारांपैकी 4 हजार 601 मतदारांचे होम व्होटिंग होणार आहे. पूर्वसूचना देऊन पथक घरी जाऊन मतदान करून घेणार आहे. पहिल्या वेळी मतदान झाले नाही तर पुन्हा संधी दिली जाणार आहे. मात्र, दोन्हीवेळेला मतदार उपलब्ध झाला नाही तर मात्र, मतदान करता येणार नाही. 201 पथके तैनात केली आहेत. सर्वाधिक पथके 39 राधानगरी तर सर्वात कमी 8 पथके हातकणंगले मतदारसंघात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.