Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचे पुन्हा धक्कातंत्र? देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा असतानाच अचानक मुरलीधर मोहोळ यांचेही नाव समोर

भाजपचे पुन्हा धक्कातंत्र? देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा असतानाच अचानक मुरलीधर मोहोळ यांचेही नाव समोर
 

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहेत. एकूण 288 पैकी 236 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपच्या 132 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या 56 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या आहेत. दरम्यान, महायुतीने निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असले, तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांचेही नाव चर्चेत येताना दिसत आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत, तरीही अजून अधिकृतपणे निर्णय घेतलेला नाही. बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा करणार असल्याचे सांगितले. महायुतीमधील सर्व नेते त्यांच्या निर्णयाला स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले.

 
 
भारतीय जनता पक्षाने एकहाती 132 जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री असणार आहे, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, अशी अटकळ राज्यातील अनेकांनी बांधली होती. मात्र, दिल्लीत बुधवारी रात्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात भेट झाली. तसेच गुरुवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यामध्ये कोणताही निर्णय न झाल्याने राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यानिमित्ताने अमित शाह यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडला आहे. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

दरम्यान राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजून ठरला नसला, तरी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.