खोकीधारकांचे
जागेवरच पुनर्वसन
सुधीरदादा गाडगीळ: खोकीधारक, गाळेधारक यांची बैठक
सांगली, दि.१४: सांगली शहरासह मतदारसंघातील खोकीधारकांचे जागेवरच पुनर्वसन केले जाईल. जिथे मूळच्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तिथे मात्र त्यांना सोयीच्या ठिकाणी जागा दिली जाईल, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
येथील गणेश मार्केटमध्ये तेथील गाळेधारक तसेच शहरातील खोकीधारक यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार होते. बैठकीला मोठ्या संख्येने गाळेधारक तसेच खोकी धारक उपस्थित होते.
आमदार गाडगीळ म्हणाले, गाळेधारक आणि खोकी धारक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे आपण एक पद्धतच ठरवून घेऊ. खोकीधारकांचा पुनर्वसनाचा जो विषय आहे तो महापालिका तसेच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा करून आपण मार्गी लावू.
ते म्हणाले, गाळेधारक आणि खोकीधारक यांच्या भाड्याचा, घरपट्टीचा तसेच अन्य करांचा विषय सुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊन मार्गी लावू. सुरुवातीला महापालिकेतील बैठकीत हा विषय चर्चेला घेऊ आणि त्यानंतर राज्य शासनाकडे जाऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. दुकान गाळे हे धारकांच्या मालकीचे करण्याबाबतचा विषयसुद्धा तातडीने मार्गी लावला जाईल. भाडे घरपट्टी अथवा कोणताही कर हा अवाजवी असणार नाही यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. भाडे किंवा घरपट्टीच्या थकबाकीबद्दल सुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊ.
पृथ्वीराज पवार म्हणाले, सुधीरदादांनी सांगली मतदारसंघासाठी चार हजारावर कोटी रुपये आणले आहेत. त्यामुळे खोकी धारकांसाठी ते निश्चितच शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवू शकतील. सांगली शहरात योग्य जागा बघून त्या त्या ठिकाणी गाळेधारकांसाठी आणि खोकेधारकांसाठी कॉम्प्लेक्स उभे करावेत अशी आमची मागणी आहे. त्यासाठी दादा शासनाकडून निधी आणू शकतील.
गाळेधारक आणि खोके धारक संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. ते म्हणाले, माजी आमदार( कै.) संभाजी पवार यांनी गाळेधारक तसेच खोकेधारकांना नेहमीच पाठबळ दिले होते. त्याचप्रमाणे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पृथ्वीराज पवार हे सुद्धा आमच्या पाठीशी सतत उभे असतात.महापालिकेकडून अवाजवी घरपट्टी आणि भाडे आकारले जाते ते कमी करून मिळावे अशी आमची मागणी आहे. यापूर्वीची थकबाकीही रद्द व्हावी अशी आमची मागणी आहे. खोके धारकांसाठी राज्य शासनाने महामंडळ स्थापन करावे अशीही मागणी आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय शिंदे, अल्ताफ शेख, विनायक साळस्कर ,गणेश कांबळे, सतीश पवार आदी उपस्थित होते.
.........
१)सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी गणेश मार्केट मधील गाळेधारक आणि सांगली शहरातील खोकीधारक यांची बैठक झाली.
२) सांगली: गणेश मार्केट मधील गाळेधारक आणि सांगली शहरातील खोके धारक यांच्या बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.